ज्ञानवापी – मशिद की मंदीर?

गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत ज्ञानवापीवर वाराणसी न्यायालयाचा निर्णय अंतिम असणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच जिल्हा न्यायालयाला आम्ही आदेश देऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालय याप्रकरणी सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ही सुनावणी केली आहे. यावेळी आम्ही दोन्ही बाजूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाराणसी न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुनावणी शक्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच वजू करण्यास मुसलमान बांधवांना पर्यायी जागा द्यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. तर ज्ञानवापीत आठ आठवडे यथास्थिती ठेवा, सर्वत्र शांतता पाळा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले आहेत. मुस्लिमांना नमाज पठण करण्यापासून रोखू नये. तसेच फक्त २० मुस्लिम बांधवांनाच नमाज करण्याचे आदेश आता लागू नाही. पुढील आठ आठवड्यांपर्यंत ज्ञानवापी संबंधित प्रश्न निकाली लागत नाही, तोवर आदेश पाळण्याचे आवाहन न्यायालयाने केले आहे. तसेच आता याप्रकरणी पुढील सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी संदर्भात तीन सूचना दिल्या आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी या सूचना दिला आहेत.
१ .जिल्हा न्यायालय प्रकरणावर निर्णय देतील.
२. अंतिम निर्णय येईपर्यंत जिल्हा न्यायालयाचा अंतरिम आदेश आवश्यक.
३.जिल्हा न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घ्यावे.