Sat. May 30th, 2020

‘थलैवा’ रजनीकांतला सिनेसृष्टीत 44 वर्षं पूर्ण, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेसृष्टीमधील पदार्पणाला 44 पूर्ण झाली आहेत. तामिळ सिनेमाजगतातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार म्हणून रजनीकांत यांचं स्थान अढळ आहे. अजूनही त्यांच्या सिनेमाला उत्सवी प्रतिसाद मिळत असतो. एखाद्या देवासारखी रजनीकांत यांची पूजा होत असते. त्यांच्या सिनेकारकिर्दीला 44 वर्षं झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. #44YrsOfUnmatchableRAJINISM हा हॅशटॅग ट्रेंडिंग होतोय


 

रजनीकांत यांच्या रूपाने तामिळ सिनेमाला एक अभूतपूर्व हिरो मिळाला होता. ‘अपूर्वरारंगल’ या सिनेमातून रजनीकांत यांनी साऊथच्या सिनेमांत पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत कमल हासन आणि श्रीदेवीसुद्धा होते. हा सिनेमा 1975 साली आला होता.

मात्र काही काळातच रजनीकांत यांनी आपल्या स्टाईलने सर्वांना वेड लावलं. त्यांचे अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर हिट झाले. आजही त्यांच्या नवनव्या सिनेमांची लोकांमध्ये उत्सुकता असते. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम करूनही रजनीकांत यांना दक्षिणेइतकी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र नंतरच्या काळात त्यांनी आपल्या दक्षिणेतील कामामुळे अवघ्या देशाला आपली दखल घेणं भाग पाडलं. उतारवयातही त्यांची स्टाईल, अभिनय, सिनेमा यांमुळे त्यांचं फॅन फॉलोइंग जगभरात पसरलं. गेल्या काही काळात शिवाजी, रोबो, काबाली, काला, पेट्टा, 2.0 यांसारख्या सिनेमांमधून रजनीकांत आजही हुकुमी एक्का असल्याचं दिसून आलंय. पुढील वर्षी ‘दरबार’ हा त्यांचा सिनेमा रिलीज होतोय.

1975 ते 1985 या 10 वर्षांतच रजनीकांत यांनी 100 सिनेमे पूर्ण केले होते. आतातर त्यांच्या करिअरला 44 वर्षं झाली आहेत.

बेंगळुरू येथे मराठी कुटुंबात जन्मलेले रजनीकांत काही वर्षं बस कंडक्टर म्हणून काम करत होते. त्या परिस्थितीतून आज देशातील सर्वांधिक फॅन फॉलोइंग असणारे आणि अशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार बनलेले अभिनेते ते बनले आहेत. मात्र तरीही ते आपल्या नम्रपणामुळे लोकांचे प्रिय आहेत. समाजसेवेत ते पुढे आहेत. त्यामुळेच लोक अजूनही त्यांच्या सिनेमाला गर्दी करतात. त्यांच्या प्रत्येक हलचालीची कॉपी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *