Wed. Oct 5th, 2022

दहशतवाद विरोधी पथकाकडून एकजण अटकेत

रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी करणारा दहशतवादी रईस अहमद शेख असादउल्ला शेख याला नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेला रईस शेख मूळचा काश्मीरमधील अवंतीपुरातला येथील आहे. एटीएसकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत असून त्याच्या नागपुरातील हस्तकाबाबतही माहिती घेण्यात येत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ओमरच्या संपर्कात रईस होता. ‘गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पाकव्याप्त काश्मीरातील कमांडर ओमर यानेच रेकी करायला सांगितली होती’, असे रईस हा सांगत आहे.

ओमरच्या संपर्कात आल्यानंतर त्याने आपल्याला नागपुरातील महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार, १३ जुलैला रईस हा विमानाने काश्मीरहून मुंबईला आला होता. तेथून विमानाने नागपुरात आला. त्याने नागपुरातील हस्तकाशी संपर्क साधला. परंतु, त्याचा संपर्क झाला नाही. त्यानंतर तो ऑटोरिक्षाने सीताबर्डी येथे आला. येथील एका हॉटेलमध्ये थांबला. १४ जुलैला तो आधी महालमधील संघाच्या मुख्यालयाची रेकी करायला गेला. परंतु, त्याला रेकी करता आली नाही.

जानेवारी महिन्यात रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी रईसविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. नुकताच दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी काश्मीरला गेले. त्याला नागपुरात आणले. एटीएस त्याची कसून चौकशी करीत आहे. ओमरचेच तो नाव घेत आहे, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.