परिक्षेदरम्यान एकाच बाकावर तीन विद्यार्थी

औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या दिवशी गोंधळ उडाला आहे. विजय काबरा महाविद्यालयात अतिरिक्त विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असल्याने एका बाकावर तीन विद्यार्थी बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अनेक अडचणीला तोंड ध्यावे लागले होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत होत्या, परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन वर्षाच्या अंतराने केलेल्या या नियोजनात अनेक त्रुटी आढळून आल्याचे दिसून येत आहे.
आज सकाळी विद्यार्थी संख्या वाढविल्याची माहिती विद्यापीठ प्रशसनाने दिली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी एका बाकावर तीन विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. हॉलतिकीट ३० आणि ३१ मे रोजी देण्यात आले, पण ते डाउनलोड करताना अडचणी आल्या. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी या महाविद्यालयात कसे आले, याची चौकशी करून निर्णय घेऊ. मात्र तिन्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय वेगळा आहे. त्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ.सतीश सुराणा यांनी दिली.