Sun. May 16th, 2021

पाऊस पडावा यासाठी ग्रामदैवत कोंडलं पाण्यात

कोणी खुर्चीसाठी तर कोणी संपत्तीसाठी देव पाण्यात ठेवतात. मात्र लातूर जिल्ह्यातील महिलांनी ग्रामदैवतालाच पाण्यात कोंडलंय, आणि ते ही पावसासाठी… पावसाने मागील दोन महिन्यापासून पाठ फिरवल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात यासाठी लातुर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळच्या महिलांनी ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथाला पाण्यात कोंडले आहे. जोपर्यंत पाऊस पाडत नाही तोपर्यंत देवाला पाण्यात कोंडू ठेवू, असं म्हणत ग्रामस्थांनी ग्रामदैवताच्या नावाने जयघोष केला. पावसासाठी हतबल झालेल्याची ही एक भाबडी श्रद्धा…

चाकूर तालुक्यातील वडवळ येथील ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरातच साकडे घालण्याचं ठरवलं.

गावाच्या महिला सरपंच शिल्पा बेंडके यांच्या पुढाकाराने गावातील शेकडो महिलांनी मंदिरातील स्वयंभू महादेवाच्या पिंडीला पाण्यात कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला.

‘आता तूच तारणहार’ अशी आर्त हाक ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथला घालण्यासाठी गावातील अनेक महिला, शेतकरी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन ओल्या कपड्यांनी मंदिरात हजर झाला.

गाभाऱ्यात पाणी भरण्यात आले.

जोपर्यंत पाऊस पाडत नाही तोपर्यंत ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथला पाण्यात कोंडून ठेवू अशी असा भोळा भाव व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी ‘ओम नमः शिवाय’चा गजर करून उपस्थित महिलांनी नागनाथांकडे पाऊस पडावा यासाठी प्रार्थना केली.

याशिवाय परिसरातील अनेक गावात शेतकरी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन ओल्या कपड्यांनी वेगवेगळ्या गावच्या मारुतीला जलाभिषेक घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पाऊस पडून दुष्काळ हटावा यासाठी ग्रामस्थ आता दैववादच्या भरवशावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *