Fri. Sep 24th, 2021

‘पिंजरा’ निखळला

काही काही माणसं जन्माला येतानाच आपल्या नावात मोठंपण घेऊन येतात की काय असा मला प्रश्न पडतो, आणि वास्तववादी जीवनात ते मोठंपण अभिमानाने मिरवतात सुद्धा. ही माणसं इतरांपेक्षा निराळीच म्हणून की काय आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करुन जातात. जनसामान्यांच्या मनावर अशी काही मोहिनी घालतात की ती कधीही विस्मृतीत जाणार नाही. अगदी काव्यरुपात सांगायचे झाले तर, “मरावे परि कीर्तीरुपी उरावे”… हे जे मी सगळे वर्णन करत आहे ते म्हणजे आपल्या अभिनयाने व्यक्तीरेखा जिवंत करणारे मराठी रंगभूमीवरील अनाभिषिक्त सम्राट, अभिनयातील ‘नटसम्राट’, अभिनयातील भीष्माचार्य डॉ. श्रीराम लागू यांचं…

डॉ. श्रीराम लागू यांचे चित्रपट आणि नाटकं न पाहिलेला माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. लागू यांनी मराठी रंगभूमीला एक वेगळी उंची दिली. त्यांचा अभिनय पाहून अनेकजण मराठी रंगभूमीकडे आकर्षित झाले. किंबहुना डॉ. लागू यांच्या अभिनय बघून मोठे झाले असं म्हटलं तरी ती अतिशोयक्ती ठरु नये.                                                                          

डॉ. लागू अभिनयसृष्टीत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मागील पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय होते. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना त्यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली. नंतर त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विलक्षण आवड याच्या जोरावर नाट्क्षेत्रात ठसा उमटवला जो कधीही पुसला जाऊ शकत नाही.

भालबा केळकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी नाट्य संस्था सुरू केली. मात्र वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या लागू यांना पुढे कॅनडा आणि इंग्लंडला जावं लागलं. पुढे त्यांनी 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय केला. परंतु त्यात त्यांचे जास्त काळ मन रमलं नाही. ज्याप्रमाणे मासा पाण्याविना तडफडत असतो, त्याप्रमाणे डॉ. लागू यांना त्यांच्या अंत:करणाने आणि इच्छाशक्तीने रंगभूमीकडे अक्षरश: खेचून आणले. ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि तोपर्यंत हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरच काम करणारे लागू खऱ्या 1969 पासून पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून कार्यरत झाले. वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली.

नाटकातील नटसम्राट

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकातील अप्पासाहेब बेलवकरांची भूमिका मराठी रंगभूमीवर ‘एक मैलाचा दगड’ ठरली. या भूमिकेचे मोहिनी प्रक्षेकांबरोबरच रंगभूमीवरील अनेक कलाकारांवर होती. डॉ. लागू यांनी या भूमिकेला एक वेगळा आयाम दिला. एक आगळंवेगळं परिमाण दिलं.

ही भूमिका चंद्रकांत गोखले, दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त, डॉ. लक्ष्मणराव देशपांडे, राजा गोसावी, उपेंद्र दाते, मोहन जोशी यांनीही नंतरच्या काळात साकारली. आज ‘नटसम्राट’मधील ही भूमिका साकारणं रंगभूमी गाजवणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न बनलंय, इतकी उंची लागू यांनी ‘नटसम्राट’मधील आपल्या भूमिकेला मिळवून दिली.

‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र, ‘आधे अधुरे’, ‘कन्यादान’, ‘सुंदर मी होणार’ आणि ‘मित्र’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या.

श्रीराम लागू यांनी वास्तववादी अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमीवरील अभिनयाच्या नाटकीय परंपरेलाच आव्हान निर्माण केलं. ज्या काळात मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार काशीनाथ घाणेकर यशाच्या शिखरावर होते, त्यावेळी डॉ. लागूंच्या रंगभूमीवरील झंझावाताने घाणेकर यांची अभिनयशैली बाद करून टाकली. परिणामी, आपलं अढळ स्थान आता आबाधित नसल्याच्या जाणीवेमुळं ते प्रचंड असुरक्षित झाले.

मकरंद साठे यांनी लिहिलेले ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे त्यांचे रंगभूमीवरचे अखेरचे नाटक ठरले.

सिनेमाशी ‘सामना’

व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘ पिंजरा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला. एका आदर्श शिक्षकाच्या आयुष्यात तमाशा कलावंतीणीमुळे घडणाऱ्याउलथापालथीची त्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे मांडली केली. या चित्रपटातून डॉ. लागू यांनी अभिनयाचा एक प्रकारे मापदंड आखून दिला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यात निळू फुलेंची बेरकी आणि भेदक नजर आणि डॉ. लागूंचा अभिनय या दोघांची तोलामोलाची टक्कर पाहणे म्हणजे रसिकांसाठी जणू पर्वणीच.

लागू आणि निळू फुले यांच्यात पुन्हा एकदा जुगलबंदी रंगली ती ‘सामना’ सिनेमात. मास्तर आणि सरपंच या दोन्ही भूमिकांत कलाकारांनी अक्षरशः जीव ओतला. दोघांमधील संवाद अतिशय मार्मिक आहेत. ‘मास्तर…गप गुमान ऱ्हावा, उगाच नुसत्या चौकशा कशाला’, ‘मारुती कांबळेचं काय झालं?’… इत्यादी.

हे ही वाचा- मोदींसह ‘या’ राजनेत्यांनी वाहिली डॉ. श्रीराम लागूंना श्रद्धांजली

‘सामना’प्रमाणेच ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयालाही रसिकांनी डोक्यावर घेतले. मराठीप्रमाणेच डॉ. लागू यांनी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’, ‘इक दिन अचानक’, ‘कामचोर’, ‘घरोंदा’, ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘लावारिस’, ‘सरगम’, ‘सौतन’ इत्यादी हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या मनावर आजही कोरल्या आहेत, ज्या कायमच्या कोरल्या राहतील. ‘अनकही’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजली.

विवेकवादी विचारवंत

डॉ. लागू हे अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड विचारांमुळेही ओळखले जायचे. विवेकवादी, पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. ‘देवाला रिटायर करा’ या त्यांचा विधानामुळं मोठं वादळ निर्माण झालं. परंतु त्यांनी आपली भूमिका अखेरपर्यंत बदलली नाही. त्यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. अंनिसशी ते जोडलेले होते. बाबा आढाव यांच्या संस्थेसाठी त्यांनी ‘लग्नाची बेडी’ नाटकाचा दौरा काढला. ज्यावेळी देशात आणीबाणी होती, त्यावेळी अन्य कलावंतासरखे शांत न राहता, त्यांना यावर आपली भूमिका मांडली आणि आणीबाणीला त्यांनी कडाडून विरोध केला. आणीबाणीच्या विरोधात निषेध म्हणून त्यांनी ‘एक होती राणी’  हे नाटक बसवलं. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे सॉक्रेटिसवरील नाटक त्यांनी केवळ अभिनेते म्हणूनच केलेलं नव्हतं, तर ते त्यांच्या वैचारिक बांधिलकीचं मूर्त रूप होतं.

याच काळात त्यांनी समांतर चळवळीचं काम नेटाने सुरू ठेवलं. ‘गिधाडे’ नाटकाच्या वेळी सेन्सॉर बोर्डाशी त्यांनी लढा दिला. डॉ. लागू नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. नव्या पिढीविषयी त्यांना आपुलकी होती. त्यांचं वाचन अफाट होतं. ‘लमाण’ या आत्मचरित्रात त्यांनी आपला अभिनयप्रवास मांडला आहे. ज्यातून नवीन पिढीने खूप घेण्यासारखे आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहांनी तर ‘लमाण’ हे पुस्तक अभिनयाचं ‘बायबल’ असल्याचं म्हटलंय.

हे ही वाचा- तत्वज्ञ नाटककार!

मराठी रंगभूमीवर नवी चळवळ उभी करणारे लागू हे पाश्चात्य नाटकांचेही अभ्यासक होते. शेक्सपिअरची नाटकं पाश्चिमेच्या रंगभूमीवर गाजवणाऱ्या ‘जॉन गिलगुड’ वा ‘लॉरेन्स ऑलिव्हिए’ यांच्या अभिनयाचा त्यांनी साक्षेपी अभ्यास केला. स्वतः कान, नाक, घशाचे डॉक्टर असल्यामुळे आवाजाचे बारकावे त्यांनी अभ्यासले होते. हाच अभ्यास त्यांच्या अभिनयातून प्रकटत असे. वाचिक अभिनयावर त्यांचं प्रभुत्व वादातीत होतं. आपल्या ‘वाचिक अभिनय’ या पुस्तकातून त्यांनी नटांनी आवाजाची काळजी कशी घ्यावी, संवादफेक कशी सुधारावी यांसारख्या प्रश्नांची उकल केली आहे.

एका पुरस्कार सोहळ्यात विचारले की, मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटते, त्यावेळी डॉ.लागूंनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक होते, रंगभूमीवर पुन्हा तारुण्यातील उत्साहाने वावरता येणार नाही. बर्फाळ प्रदेशात पुन्हा एकमेकांवर बर्फ उडवता येणार नाही, भटकंती करता येणार नाही याचे मला दु:ख असल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली.डॉ. लागूंनी प्रचलिच विचार, आणि तत्वांशी बंड करुन आयुष्यभर नाटक, चित्रपट या क्षेत्रात लीलया मुशाफिरी केली. मराठी रंगभूमीला आधुनिकतेचा साज चढवतानाच वैचारिक धारही देणाऱ्या डॉ. श्रीराम लागूंना भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *