पिवळ्या पाण्याने लातूरकरांचं आरोग्य धोक्यात

लातूर शहराला मागील एक महिन्यापासून पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे सर्वसामान्य लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला मात्र हे पिवळसर पाणी कसे आणि कुठून येते यावर अद्याप उपाय सापडला नाही. अशातच पाण्याबाबत निर्माण झालेल्या या समस्येमुळे सामान्य लातुरकरांमध्ये रोष वाढत चालला आहे.
महानगर पालिका प्रशासन पाणी पिण्यालायक असल्याचे सांगत आहे. कधी धरणांमधील पाण्यामध्ये शेवाळ आहे तर कधी जलशुद्धीकरण प्रकल्पातून लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये बिघाड आहे. मनपा अशी वेगवेगळी कारणे देत आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ करणं मनपाला शक्य होत नाही.
सर्वसामान्य लोकांची अवस्था खूप वाईट बनली आहे. पिवळ्या रंगाच आणि गढूळ पाणी येत असल्याने पाणी पिण्यालायक नाही. म्हणून रोज ३० ते ४० रुपयांचे पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. मनपाला याच्यातून मार्ग सापडत नाहीये आणि लातूरकरांचा खर्च आणि मनस्ताप संपत नाहीये अशी स्थिती आहे. लातूर शहरात आज नंदी स्टॉप, राम नगर भागात पाणी आले होते. ते पाणी पिवळसर येत आहे. या पिवळ्या पाण्याने लातूरकरांचं आरोग्य धोक्यात आल्याचं दिसत आहे.