Sat. Dec 14th, 2019

पुणे: मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना महापौरांसमोरच मारहण!

पुणे महानगरपालिकेत सोमवारी धक्कादायक प्रकार घडलाय. नगरसेवकांना तुमची लायकी काय असे म्हणणारे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना कार्यकर्त्यांनी चक्क श्रीमुखात भडकावली. महापौर कार्यालयात महापौरांदेखत हा प्रकार घडल्याने महापौर देखील चांगल्याच संतापल्या होत्या.

जलपर्णीची निविदा आठपट दराने काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बैठे आंदोलन केले.

यावेळी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी केली.

यावेळी तेथे उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांना माहिती देत होते.

नगरसेवक आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यात जुंपली

त्याचवेळी नगरसेवकांनी ज्यांच्या अधिकाराखाली निविदा प्रक्रिया राबवली त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत, असा आरोप काँग्रेस चे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला.

त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे, असे सुनावले.

यामुळे नगरसेवक संतप्त झाले. तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असे म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले.

त्यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात भडकवली.

 

शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीतील सांडपाण्यामुळे जलपर्णी हे नेहमीचे संकट झाले आहे.

त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याऐवजी महापालिकेने नदीतील जलपर्णी काढण्याकरिता गेल्या पाच वर्षांत साडेचार कोटी रुपये खर्च केला आहे.

2014- 15 1 कोटी 67 लाख
2015- 16 30 लाख 3 हजार 780
2016- 17 78 लाख 79 हजार 390
2017- 18 72 लाख
2018- 19 66 लाख 24 हजार
2019-20    3 कोटी

नदीतील जलपर्णीसाठी महापालिकेच्या नव्या अर्थसंकल्पात 2019-20 साठी आयुक्त सौरभ राव यांनी तीन कोटी रुपये राखून ठेवले आहेत.

झालेला सर्व प्रकार महापौर यांच्या समोर घडला, त्यामुळे महापौर यांनी असली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही अश्या शब्दात विरोधकांना धमकीवजा इशारा दिला.

तर याबाबतचे कारवाईचे सर्व अधिकार आयुक्तांना दिलेत.

मारहाण कुणी केली, माहिती

भाजपच्या नगरसेवकांचा घोटाळा लपवण्यासाठी सत्ताधारी आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना समोर करतय असा आरोप काँग्रेसने केलाय तर घडलेल्या घटनेत अतिरिक्त आयुक्तांची भाषा ही योग्य नव्हती म्हणून आम्ही प्रत्युत्तर दिले. मात्र त्यांना मारहाण कुणी केली हे माहीत नाही. मारहाण करणारे आमचे कार्यकर्ते नाहीत असा खुलासा अरविंद शिंदे यांनी केलाय.

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा सर्वाना आहे. मात्र अश्या प्रकारे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारहाण करणं हे निषेधार्य आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेत ‘ते’ कार्यकर्ते कुणाचे होते याचा तपास होणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *