Wed. Jun 29th, 2022

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास होणार

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला इतिहास लाभला आहे. तसेच बालगंधर्व मंदिराशी पुणेकरांच्या अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत. अशातच आता बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला आहे. या रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, बांधकामासाठी ७० कोटी, तर फर्निचर आणि इतर सुविधांसाठी ३० ते ४० कोटींचा खर्च असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच, बीओटी तत्त्वावरही हा प्रकल्प उभारण्यासंबंधीची चाचपणी केली जाईल, असेही महापालिका आयुक्त्यांनी सांगितले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या कामाला पालिका आयुक्तांकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. आता, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास होणार असून नव्या वास्तूत तीन विविध आसनक्षमतेची नाटय़गृहे, तीन कलादालने, खुला रंगमंच आणि उपाहारगृह बांधण्यात येणार आहे. मात्र आता यासाठी काही नाट्यकर्मी रंगकर्मी यांनी विरोध केला आहे. नव्या रंगमंदिराचा आराखडा तयार करण्यासाठी नुकतेच वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागवले होते. महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यासाठी राज्यातील वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागविले. त्यात आलेल्या ८ प्रस्तावांपैकी एका प्रस्तावाची निवड २१ सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय पदाधिकार्‍यांच्या निवड समितीने केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. यावर पवार यांनी सूचना आणि बदल सुचविले असून, १५ दिवसांनी पुन्हा फेरसादरीकरण होणार आहे. तसेच काही प्रस्ताव स्वीकारून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने रंगमंदिर पाडण्याचा घाट कायम ठेवलाय. मात्र, बालगंरधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी राष्ट्रवादीने ही साथ दिलीय. तसेच मेट्रोच्या प्रस्तावित स्कायवॉक आणि पार्किंगसाठीच पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या रंगमंदिराची वास्तू पाडून तिचा पुनर्विकासाचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.