Mon. Aug 15th, 2022

भाजपच्या महाराष्ट्रातील विजयाचे ‘मॅन ऑफ मॅच’!

लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात धुवांधार यश मिळालेलं आहे. या यशाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना असलं तरी ‘मॅन ऑफ द मॅच’ मात्र सरकारचे संकटमोचक गिरिश महाजन ठरल्याचं बोललं जातंय. उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागा मोठ्या फरकानं निवडून आणण्याचा करिष्मा गिरिश महाजन यांनी करुन दाखवला आहे..त्यामुळे सहाजिकच राज्यात आणि केंद्रातही गिरीश महाजन यांच वजन आणखी वाढलं आहे..

भाजपला मिळाले नवे ‘महाजन’!

सरकारचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा करुन दाखवला आहे.

उत्तर महाराष्ट्रतल्या नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर, नंदुरबार,शिर्डी आणि नगर या सगळ्या जागांची जबाबदारी गिरीश महाजन यांनी घेतली होती.

यापैकी दिंडोरी, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जागांबाबत संभ्रम होता.

‘मात्र आठही सीट्स मोठ्या फरकानं निवडून येतील’ असा महाजनांनी केलेला दावा खरा ठरला.

एकीकडे राज्यातला निकालांमुळे मुख्यमंत्र्यांची देशात वाहवा झालेली असताना त्यापाठोपाठ गिरीश महाजन यांचं राजकीय वजन वाढलंय.

लाखांच्या फरकाने जिंकल्या जागा

उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा विभागवार विचार केला, तर लक्षात येईल की लाखांच्या फरकानेच सगळ्या जागा विजयी झाल्या आहेत.

 

दिंडोरी –

भारती पवार -5,67,098

धनराज महाले – 3,68,287

दोघांमधला फरक – 1,98,811

 

नाशिक –

हेमंत गोडसे – 5,61,812

समीर भुजबळ – 2,70,731

दोघांमधला फरक – 2,91,081

 

धुळे –

सुभाष भामरे – 6,13,533

कुणाल पाटील – 3,84,290

दोघांमधला फरक – 2,29,243

 

अहमदनगर –

सुजय विखे पाटील – 6,96,961

संग्राम जगताप – 4,19,364

दोघांमधला फरक – 2,77,597

 

नंदुरबार –

हिना गावित – 6,39,136

के सी पाडवी – 5,43,507

दोघांमधला फरक – 95,629

 

रावेर –

रक्षा खडसे – 6,55,386

उल्हास पाटील – 3,19,504

दोघांमधला फरक – 3,35,882

 

जळगाव –

उन्मेष पाटील – 7,13,874

गुलाबराव देवकर – 302257

दोघांमधला फरक – 4,11,617

 

या सगळ्या आकड्यांवरुन आपल्याला लक्षात येतं की गिरीश महाजन यांनी जबाबदारी घेतलेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागांवर उमेदवारांनी लाखांच्या घरात आघाड्या घेतल्या.

गिरीश महाजन यांच होम पिच असलेल्या जळगावामध्ये उन्मेष पाटील यांनी रेकॉर्डब्रेक 4 लाखांच्या आघाडीनं विरोधकांना पराभूत केलंय. या आकड्यांवरुन देशाबरोबरच राज्यातल्या नेतृत्वावरदेखील जनतेनं विश्वास टाकल्याचं बघायला मिळालं.

ऐन निवडणूक काळात राज्य सरकारच्या प्रत्येक अडचणीच्या काळात संकटमोचक म्हणून गिरीश महाजन धावून आले.

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नेमका कल काय असले हे सांगणं कोणालाही जमत नसताना महाजन यांनी मात्र राज्यात 40 पार करू आणि उत्तर महाराष्ट्रात आठही जागा जिंकू असा दावा केला आणि तो खरादेखील करुन दाखवला.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात तर गिरिष महाजन यांचं वजन वाढलंच आहे मात्र दिल्ली दरबारीही त्यांनी आपला करिष्मा दाखवून दिल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.