Sat. Oct 1st, 2022

‘मी आहे तो पवारांमुळेच’

शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्त्युत्तर दिले होते. यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध दीपक केसरकर असा वाद रंगला आहे. त्यावर आज दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्याच्याबद्दल कधीही अपशब्द काढला नाही. तरीही चुकून काही बोललो असेल, तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. याशिवाय आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन माफी मागेन. ते माझ्या गुरुसारखे आहेत, असा यू टर्न शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी घेतला आहे.

पुढे ते म्हणाले की, शिवसेनेत झालेली फूट आणि त्यासंदर्भात मी केलेली वक्तव्य ही घडलेली एक वस्तूस्थिती होती. परिस्थितीचा मी उल्लेख केला. २०१४ साली भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. त्यानंतर जे सरकार स्थापन झाले, त्यावेळी पवार साहेबांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. या घटनांचा आणि पवार साहेबांबद्दल चुकीचे वक्तव्य करण्याचा काही संबंध येत नाही.

केसरकर म्हणाले की, पवारसाहेबांच्या वतीने मला भेटायला आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. हो ते आले होते. पण, ते नारायण राणे यांच्या मुलाचा प्रचार करा हे सांगायला आले होते. ते अजिबात पवार साहेबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आले नव्हते. त्यानंतर जेव्हा पवारसाहेब सावंतवाडीला आले, त्या दिवशी मी माझ्या मतदारसंघात होतो आणि मी माझा राजीनामा पवार साहेब यांच्याकडे सोपवला. तो अत्यंत नम्रपणाने दिल्याचे केसरकरांनी सांगितले. मी तुमच्यामुळे आमदार आहे. मात्र, मी राणे यांच्या मुलाचा प्रचार करू शकत नसल्याचे पवारसाहेबांना मी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.