Mon. Aug 15th, 2022

‘मुंबई, महाराष्ट्रात जागा देणार नसाल…’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांपासून विरोधक भाजपपर्यंत सर्वांवर टीका केली. मात्र आता या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना आता दुसरा भाग देखील जनतेसमोर आला आहे. या भागात उद्धव ठाकरेंनी विविध महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. तसेच मुंबई पालिकेसह राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांसंबंधित देखील मोठं विधान केलं आहे.

शिंदे गटातील आक्रमक बंडानंतर उद्धव ठाकरेंना एकावर एक धक्के अजूनही बसत आहेत. त्या दृष्टीने ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे. ‘मुंबईचा घात करू नका’ हे उद्धव ठाकरेंचं वाक्य धरत राऊत पुढचा सवाल करतात की अलीकडच्या राजकारणात मुंबईचाच घात करण्याचा प्रयत्न दिसतो आहे का?, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईवर शिवसेनेचा असलेला पगडा भाजपला पुसायचा आहे. हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. जसा रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत असतो, तसा या राजकारण्यांचा जीव हा मुंबईत आहे. दिल्ली मिळाली तरी यांना मुंबई पाहिजे असते. ज्यावेळी शिवसेना-भाजपची युती होती त्यावेळीही भाजपने सेनेला देशात पसरू दिलं नाहीच मात्र महाराष्ट्रात आणि मुंबईतही तुम्ही आम्हाला जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?, अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद बंडखोर आमदारांच्या भूमिकेमुळे चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील हा अभूतपूर्व बंड आणि सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रथमच मुलाखत दिली आहे. जरी उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत शिवसेनेचंच मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला ही मुलाखत दिली असली तरी राज्याच्या राजकारणासाठी ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.