मोदी पुन्हा PM झाले नाहीत, तर मी अय़ोध्येत आत्महत्या करेन- रिझवी

लोकसभा निवडणुकींचा चौथा टप्पा पार पडला आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी मोदी समर्थकांची तीव्र इच्छा आहे. अशातच वक्फ शिया बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. “जर मोदी 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत, तर मी अयोध्येत जाऊन आत्महत्या करेन”, असा इशाराच रिझवी यांनी दिलाय.

काय म्हणाले रिझवी?

कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्र मोठं असतं.

मी जेव्हा राष्ट्रहिताचं बोलतो, तेव्हा कट्टरतावादी लोक मला ठार करायची धमकी देतात.

एकदा मोदी सत्तेतून दूर झाले, की तुमचे तुकडे तुकडे करून टाकू अशा धमक्या आपल्याला येत असल्याचंही रिझवी म्हणाले.

देशद्रोही लोक मोदी सत्तेतून गेल्यास माझ्या जीवाचं बरंवाईट करू शकतात. त्यामुळे जर त्यांच्या पाठिंब्याने इतर कुणी पंतप्रधान बनल्यास मी अय़ोध्येमध्ये राममंदिराच्या दरवाजाशी जाऊन आत्महत्या करेन. देशद्रोहींच्या हातून मरण्यापेक्षा अशी आत्महत्या हे माझ्यासाठी स्वाभिमानाचं मरण असेल, असंही त्यांनी म्हटलंय.

देशप्रेमींच्या मनात मोदींबद्दल प्रेम आहे आणि देशद्रोह्यांच्या मनात राग आहे अंही विधान वसीम रिझवी यांनी केलंय. वसीम रिझवी आपल्या राममंदिरासंदर्भातील विधानांमुळे कायमच चर्चेत असतात.

मदरशांवरील बंदीच्या मागणीमुळे रिझवी होते चर्चेत

यापूर्वी त्यांनी देशातील सर्व प्राथमिक मदरसे बंद करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली होती. या मदरसांमध्ये ISIS ची दहशतवादी विचारधारा पसरवण्याचं काम केलं जातं, असा आरोप त्यांनी केला होता. जर या मदरशांवर आत्ताच बंदी घातली नाही, तर पुढील 15 वर्षांनी देशातील अर्ध्याहून जास्त मुस्लिम ISIS च्या विचारसरणीचे समर्थक बनतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

Exit mobile version