राजधानीत कोरोना प्रादुर्भाव वाढला

राजधानीत कोरोना प्रादुर्भाव वाढला
देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत दररोज १ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत आता कोरोनाचे १४२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र, ८ मे रोजी एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. संसर्ग दराबद्दल बोलायचे तर, दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर ५.३४% वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत २६६४७ चाचण्या करण्यात आल्या.
दिल्ली सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन कोरोनाबाधितांसह राजधानीत कोविड – १९ रुग्णांची एकूण प्रकरणं आता १८,९४,२५४ वर पोहोचली आहेत. तर मृतांची संख्या २६,१७९ वर पोहोचली आहे. यापूर्वी, शनिवारी राजधानी दिल्लीत ४.७२ टक्के पॉझिटिव्ह दरासह १,४०७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर, शुक्रवारी शहरात कोविड-१९ च्या १,६५६ रुग्णांची नोंद करण्यात आली असून ४ फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक आहे. या दरम्यान, कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर ५.३९ टक्के होता.
गेल्या २४ तासांत दिल्लीत २६६४७ चाचण्या करण्यात आल्या असून १४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्लीत कोरोनाचे एकूण ५९३९ सक्रिय रुग्ण आहेत आणि कंटेनमेंट झोनची संख्या १८९६ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.
दरम्यान, दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली असून मास्क न वापरणऱ्यांकडून दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ज्यावेळी कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकड्यात घट झाली होती, त्यावेळी मास्कसक्ती नव्हती. तसेच, दंड वसुलीही केली जात नव्हती. मात्र आता मास्कशिवाय कोणी आढळल्यास त्याच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.