Tue. Jun 28th, 2022

राज्यभरात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढतो आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण, सांगली, अहमदनगर, नांदेड, पुणे जिल्ह्यासहित अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी शेती मालाचे नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. सांगलीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर विजांचा कडकडाट झाला. तसेच जिल्ह्यातील द्राक्ष, तसेच डाळिंबाच्या बागांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

सोलापुर शहर आणि जिल्ह्यात ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास पाऊस पडला असून शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मध्यरात्री अवकाळी पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे उन्हाळी पिकं फळबागांच मोठं नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने उन्हाळी ज्वारी, सोयाबीन या पिकांसोबतच आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप, रब्बी पिकांच मोठं नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन घेतले आहेत. तसेच त्यासाठी मदत करण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.