शेतात अचानक वर्तुळाकार भगदाडं, शेतकऱ्यांमध्ये भीती!

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील काळेगाव(हरसोडा) जवळील रावळगाव शिवारात झालेल्या पावसादरम्यान भला मोठा आवाज झाला. शेतकऱ्यांनी पाऊस ओसरल्यानंतर शेतात जाऊन बघितलं. तेव्हा पाच ते सहा शेतकऱ्यांच्या शेतात दीड ते दोन फुट रूंद आणि 200 X 200 फुटाचं गोलाकार व्यासाचं मोठं भगदाड जमिनीत पडल्याने आणि शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झालं. याची बातमी वार्यासारखी गावात पसरताच बघ्यांची एकच गर्दी झाली
काय घडलं नेमकं?
रावळगाव येथील गजानन मधुकर दाभाडे गट नं 132, 133 श्रीकृष्ण पांडुरंग रायपुरे गट नं 134, संजय नारायण मोरे गट नं 101, 102 विष्णू हरिदास रायपुरे गट नं 126, 127 मध्ये वर्तुळाकार भगदाडं पडून पिकांचं नुकसान झाल्याचं दिसलंय.
ही बाब गंभीर स्वरूपाचे असून याबाबत भूसर्वेक्षण तपासणी विभागाकडे माहिती देण्यात आलीय.
शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
मजुरही या शेतात काम करण्यास नकार देत आहेत.
त्यामुळे भूसर्वेक्षण तपास अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन शंकानिरसन करावं. तसंच शासनाने या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानभरपाई त्वरीत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.