स्वराज्याचे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांच्यावर सिनेमा, पाहा पोस्टर…

‘आरारारा…. खतरनाक’ या दोन शब्दांनी तुफान प्रसिद्ध झालेला लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे याचा ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमा महाराष्ट्रात लोकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर आता प्रविण तरडे नवा सिनेमा घेऊन येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमावर आधारित आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय.
सिनेमाचं नाव ‘सरसेनापती हंबीरराव’ असणार आहे.
या सिनेमाबद्दल पोस्ट करताना ‘नवा चित्रपट, नवा थरार\ सरसेनापती हंबीरराव’ असं त्यांनी लिहिलंय.
तसंच ‘लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे आणि टीम’ असं म्हणत टीमलाही त्याचं श्रेय दिलं आहे.
‘तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ’ अशा स्फूर्तीदायक शब्दांत हंबीररावांच्या गाथेचं यथार्थ वर्णन पोस्टरवर केलंय.
हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोहोंच्या कारकीर्दीत स्वराज्याच्या सरसेनापतीपदाची जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडली.
स्वरज्यनिर्मितीत मोलाचा वाटा असणाऱ्या ‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमात हंबीररावांचा हाच जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे.
‘शिवनेरी फाउंडेशन’तर्फे या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे.
संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा हे सिनेमाचे निर्माते आहेत.
सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशा जबाबदाऱ्या प्रविण तरडे यांनीच उचलल्या आहेत.
या सिनेमात हंबीररावांची भूमिकाही प्रवीण तरडेच करणार का, याबद्दल मात्र अजून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही.
जानेवारी 2020 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.