मुंबईत १० टक्के पाणीकपात

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ ९.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाअभावी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे सोमवारपासून (२७ जून २०२२) मुंबई पालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. तसेच पुढील ३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक असल्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के कपात करण्यात येणार आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा,तुळसी,विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. राज्यातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मात्र, पुरेसा पाणीपुरवठा धरणक्षेत्रात झालेला नाही. तर, सात तलावांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
यंदा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तलावाच्या पातळीत पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत ही पाणीकपात सुरूच राहील. मुंबईला वर्षभराच्या पुरवठ्यासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात वर्षाला सरासरी २,२०० ते २,३०० मिमी पाऊस पडतो. पाणलोट क्षेत्रात सरासरी २०६ मिमी पाऊस झाला आहे. तर गेल्या वर्षी पाणलोट क्षेत्रात सरासरी ६०१ मिमी पाऊस झाला होता. महापालिकेने मुंबईकरांना निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा असं आवाहन केलं आहे.