Mon. Dec 6th, 2021

59 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्राच्या ‘या’ हुतात्म्याला न्याय!

संयुक्त महाराष्ट्रासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या रक्तरंजित लढ्यातील कोल्हापूरच्या शंकरराव तोरस्कर याना हुतात्मा जाहीर करायला मात्र सरकारला 59 वर्षे लागली. तोरस्कर यांच्या प्रमाणे आजही अनेक जणांनी या लढ्यासाठी बलिदान दिले असून त्यांचाही योग्य शोध घेऊन शासनाने सन्मान करण्याची गरज आहे.

संयुक्त महाराष्ट्रासाठी अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता. एवढंच नव्हे, तर बेळगावसह सीमाभागही या लढ्याला पाठिंबा देत रस्त्यावर उतरला होता. या लढ्याची ठिणगीच बेळगाव मधून पडली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मन, मनगट घट्ट करत मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी जीवाची पर्वा न करता तरुण रस्त्यावर उतरत होते. कोल्हापूरचे हुतात्मा शंकरराव तोरस्कर हे ही यापैकीच एक…

गाथा ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’च्या चळवळीची

काय घडलं होतं त्या 17 जानेवारीला?

बेळगावात  17 जानेवारी 1956 ला आंदोलकांवर पोलिसांनी दडपशाही करत लाठीमार केला.

त्याचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात उमटले होते.

सरकारच्या दडपशाहीचा निषेध म्हणून बिंदू चौकात सभा घेण्यात आली होती.

तालीम,संस्था,मंडळे यांचे कार्यकर्ते या सभेला जात होते.

बुधवार पेठेतून 21 वर्षाचा उमदा तरुण शंकरराव बिंदू चौकाकडे संचारबंदी झुगारून गेला होता.

सभा सुरू झाली आणि पोलिसांनी लाठीमार करत जमवायला पांगवायला सुरुवात केली.

तरीही जमावाने त्याला जुमानलं नाही.

शंकरराव तोरस्कर व्यासपीठाकडे जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

मात्र या शूरवीराने संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा सुरूच ठेवत पोलिसांना प्रतिकार केला.

गोळी लागूनही तरुण थांबत नाही म्हटल्यावर पोलिसांनी त्यांच्या पोटात संगीन खोपसली यामध्ये ते जखमी झाले.

त्यांना त्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ज्येष्ठ नेते एन डी पाटील,बाबुराव धारवाडे,नारायण जाधव आदींनी त्यांना उपचारासाठी तात्काळ हलवले.

मात्र सात दिवसातच उपचार सुरू असताना त्यांना हौतात्म्य आलं.

कोण होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्मे?

पुन्हा एकदा लढा!

खरंतर पश्चिम महाराष्ट्रातील या लढ्याचे पाहिले हुतात्मे तोरस्कर ठरले होते. मात्र लालफितीच्या कारभारात हुतात्म्यांनाच डावलण्याचा प्रकार घडला होता. तोरस्कर यांच्या घरातच लढाऊ बाणा असल्याने त्यांचे पुतणे संजय यांनी रुग्णालयातील कागदपत्रांपासून त्या लढ्यातील सहभागी व्यक्तींचे जबाब सरकार दरबारी सादर केले. 2011 पासून चार वर्षे ते हा लढा देत होते अखेर 2016 मध्ये याला यश आलं. मुंबईतील हुतात्मा स्मारकावर 107 वा हुतात्मा म्हणून त्यांचं नाव अभिमानाने कोरलं गेलं.

संयुक्त महाराष्ट्राच्या या रक्तरंजित लढ्यात अनेकांनी बलिदान दिलं आहे. मात्र तोरस्कर यांच्याप्रमाणे आजही ते न्यायाच्या प्रक्रियेत आहेत. नातेवाईकांनी येऊन कागदपत्रे सादर केल्यानंतरच त्यांचा सन्मान करण्यापेक्षा सरकारनेच शोध समिती नेमून ज्यामुळे आपण ‘गर्जा महाराष्ट्र’ माझा अभिमानाने म्हणतो त्याचप्रमाणे त्या कटुंबियांनाही अभिमान वाटेल असं काम करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *