शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

विक्रोळीतील शिवसेना उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलंय. हा गोळीबार गँगस्टर प्रसाद पुजारी याच्या सांगण्यावरून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एकाला मध्यप्रदेश व दुसऱ्याला ठाणे येथून विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं कृष्णधर सिंग आणि आनंद फडतरे अशी आहेत.
विक्रोळी येथील रहिवासी असलेले जाधव यांच्यावर 19 डिसेंबर रोजी मंदिराच्या आवारातच गोळीबार करण्यात आला होता.
जाधव विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.
विक्रोळीतील म्हाडा किंवा अन्य शासकीय खाजगी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, त्यातील विविध कंत्राटे, लोकप्रतिनिधींच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विविध योजना आदींची जबाबदारी जाधव पाहत होते.
येथील संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या प्रसाद पुजारी यांने जाधव यांना अनेकदा धमकावले होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली होती व त्यानुसार त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली आहे.