Sat. Jul 31st, 2021

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे धावणार 2200 जादा बसेस

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. ST, गणेशोत्सव आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नातं आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे.

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहे.

येत्या 27 जुलै पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे,यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे 27 जुलै पासून करता येणार आहे.

20 जुलैपासून ग्रुप बुकिंगला सुरूवात..

गणपती उत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात.

मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात, ही बस त्यांना सोयीची ठरते.

गेली कित्येक वर्ष ST या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती आणि गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे.

अशा ग्रुप बुकिंगला 20 जुलै पासून सुरुवात होत आहे.

संबंधित लोकांनी ग्रुप बुकिंग साठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असं आवाहन ST महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

मुंबई आणि उपनगरातील 14 ठिकाणाहून जादा बसेस सुटणार.

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील 14 बसस्थानकं आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.

तसंच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनं दुरुस्ती पथकं (ब्रेक डाऊन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *