Jaimaharashtra news

रेमडेसिविरच्या २२०० कुप्या जप्त

पोलीस आणि अन्न औषध संचालनालयाच्या पथकाने शहरातील औषधे निर्यात करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर सोमवारी रात्री छापे घालून रेमडेसिविरच्या २२०० कुप्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स आणि पश्चिम उपनगरातील मरोळ येथील दोन व्यावसायिकांकडे रेमडेसिविर कुप्या पडून आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने अन्न आणि औषध संचालनालयातील अधिकाऱ्यांबरोबर रात्री या दोन्ही ठिकाणी छापा घातला. मरिन लाईन्स येथील व्यावसायिकाकडून २०० तर मरोळ येथील व्यावसायिकाकडून दोन हजार रेमडेसिविरच्या कुप्या जप्त करण्यात आल्या. या दोन्ही व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आली.

रेमडेसिविर उत्पादकांकडून या व्यावसायिकांनी परेदशी निर्यात करण्यासाठी कुप्या विकत घेतल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी आणल्याने कुप्या व्यावसायिकांकडेच पडून राहिल्या. सध्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविरचा तुटवडा असून रुग्णांच्या नातेवाईकांची कुप्या मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे. अशा परिस्थितीत निर्यातदार व्यावसायिकांनी अन्न आणि औषध संचानालयाची परवानगी घेऊन रेमडेसिवीरचा साठा स्थानिक वापरासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार मरोळ येथून हस्तगत के लेल्या दोन हजार रेमडेसिविर कुप्या एका औषध उत्पादक कंपनीच्या आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या कुप्या अन्न आणि औषध प्रशासनाने ताब्यात घेतल्या. पुढील चौकशी आणि कुप्यांच्या वापराबाबतची कारवाई प्रशासनाकडून केली जाईल.

Exit mobile version