Thu. Jul 2nd, 2020

‘हम आपके है कौन?’ ला आज 25 वर्षं पूर्ण

90 च्या दशकात बॉलिवूनडच्या सिनेमांचं स्वरूप बदलत होतं. मात्र 1994 च्या 5 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या ‘हम आपके है कौन’ सिनेमाने Bollywood सिनेमाची गणितंच बदलली. त्यावेळच्या तद्दन मसालापटांना फाटा देत संपूर्ण कौटुंबिक मनोरंजनाच्या व्याख्या या सिनेमाने लिहिली. या सिनेमात ना कोणता खलनायक होता, ना हाणामारी. हा सिनेमा केवळ हिरोवर सगळा फोकस असणारा नायककेंद्री नव्हता. रोमँटिक असला, तरी हिरो-हिरॉइन्सवरच बेतलेला नव्हता. या उलट या सिनेमात दिसणारी नातलग, मित्रपरिवार या सर्वांची गर्दी ही जास्त मनोरंजक होती. एवढंच काय, तर सिनेमातील कुत्रा ‘टफी’ या सिनेमातील विशेषतः क्लायमॅक्स मध्ये महत्त्वाचा ठरला.

कौटुंबिक सिनेमे बनवणाऱ्या ‘राजश्री प्रोडक्शन’ च्याच ‘नदीया के पार’ या 1982 साली बनवलेल्या सिनेमाचा श्रीमंत रिमेक होता.

दिग्दर्शक सूरज बढजात्या यांच्या पहिल्या वहिल्या ‘मैने प्यार किया’ सिनेमाने सलमान खानला स्टार बनवलं होतं. या सिनेमातही भारतीय आदर्श, मूल्यं, संस्कार यांची रेलचेल होती.

‘हम आपके है कौन’ या सिनेमाने भारतीय संस्कृतीतील कौटुंबिक मुल्यांना मोठ्या पडद्यवर आणून एक वेगळं वलय मिळवून दिलं.

सिनेमात सलमान खान आणि माधुरी दिक्षितने साकारलेल्या ‘प्रेम’ आणि ‘निशा’च्या भूमिका प्रचंड गाजल्या.

या सिनेमावर सुरुवातीला समीक्षकांनी टिकेची झोड उठवली होती. हा सिनेमा नसून लग्नाची कॅसेट आहे अशी टीका त्यावर झाली होती.

या सिनेमात 14 गाणी होती. एवढी गाणी असणारा हा पहिला सिनेमा होता. केवळ हिरो हिरॉइनच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबंच्या कुटुंब या गाण्यांमध्ये होती. समधी- समधन नात्यावर गाणं होतं, भाभीचा डान्स होता.

ही गाणी एवढी लोकप्रिय झाली की निव्वळ ऑडियो कॅसेट्सचा खप सव्वा कोटींच्या घरात गेला.

या सिनेमातील ‘मुझसे जुदा होकर…’ हे गाणं स्वतः सलमान खानचं आवडतं आहे, तर ‘दीदी तेरा देवर दिवाना…’ हे माधुरी दीक्षितचं.

या सिनेमातील ‘धिकताना’ गाण्यावरून आधी सिनेमाला ‘धिकताना’ हे नाव देण्याचा निर्माते आधी विचार करत होते.

या सिनेमात सलमान खान ऐवजी आधी आमिर खानला विचारण्यात आलं होतं. मात्र सिनेमाची कथा पसंत न पडल्याने त्याने या सिनेमाला नकार दिला होता.

या सिनेमाचं शुटिंग उटी येथे पार पडलं होतं.

5 ऑगस्ट 1994 रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.

मुंबईच्या लिबर्टी थिएटरमध्ये हा सिनेमा 100 आठवडे चालला.

हा सिनेमा तेलुगूत प्रेमालयम नावाने रिलीज झाला आणि 25 आठवडे चालला.

लंडनच्या थिएटरमध्ये HAHK 50 आठवडे चालला, तर कॅनडातील टोरंटो येथे 75 आठवडे चालला.

25 वर्षांपूर्वी या सिनेमामे 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. इतकी कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा होता.

या सिनेमाचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं. कारण 1996 सालापर्यंत हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला होता.

फॅमिली पिकनिकप्रमाणे सर्व कुटुंबं आपल्या नातेवाईकांना घेऊन या सिनेमाला जात होते.

या सिनेमाने अनेक नातेवाईकांमधील, त्यांच्या कुटुंबांमधील दरी नष्ट केली.

तसंच या सिनेमात रात्री सर्व पात्रं एकमेकांकडे उशी पास करत शिक्षा देण्याचा जो खेळ खेळले, तो नंतर अनेक कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाला.

सखरपुडा, लग्न, डोहाळ जेवण यांसारख्या घरगुती कार्यक्रमांमध्ये ‘हम आपके है कौन’ मधील समारंभांचा पगडा असे. HAHK सिनेमातील कलाकारांप्रमाणेच कपडे, डान्स, सोहळे साजरे होत.

या सिनेमाने 1994 साली सर्वांत लोकप्रिय सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला होता.

या सिनेमामुळे पॉमेरियन जातीच्या कुत्र्याच्या खरेदीने उच्चांक गाठला होता. सिनेमातील ‘टफी’ या कुत्र्यामुळे बहुतेक जण आपल्या कुत्र्याचं नाव ‘टफी’ ठेवत होते.

HAHK मध्ये मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे नोकराच्या भूमिकेत असल्याने सुरुवातील त्यांच्यावर टीका झाली. मात्र सिनेमात त्यांची भूमिका लोकप्रिय झाली. विशेषतः भाभीच्या मृत्यूनंतरचा त्यांचा आक्रोश रसिकांना भावला.

माधुरी दीक्षित बरोबरच मराठी अभिनेत्री रीमा, रेणुका शहाणे यांच्या भूमिकाही लोकांना खूप आवडल्या.

त्याकाळी सिनेमांमध्ये बहुतेकदा खलनायकांच्या भूमिका साकारणारे अनुपम खेर आणि मोहनीश बहल यांच्या कुटुंबवत्सल भूमिकाही प्रेक्षकांना विशेष पसंतीस पडल्या.

आजचा आघाडीचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहर 1994 पर्यंत सिनेमामध्ये करिअर करण्यासाठी उत्सुक नव्हता. मात्र अनुपम खेर यांच्या इच्छेखातर त्याने हम आपके है कौन पाहिला, आणि त्याला आपणही असाच कौटुंबिक सिनेमा बनवावा, असं वाटू लागलं आणि तो Bollywood सिनेमात करिअर करण्यासाठी तयार झाला.

‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाची कथा लिहिल्यावर करण जोहर सूरज बढजात्याला ती वाचून दाखवण्यासाठी गेला आणि ‘हम आपके है कौन’ इतका हा सिनेमा चांगला व्हावा म्हणून त्यांचं मार्गदर्शन त्याने घेतलं.

या सिनेमानंतर पुढच्याच वर्षी आलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाने जरी अनेक रेकॉर्ड्स केले असले, तरी त्यातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रसंग HAHK वरून प्रेरणा घेऊन केले होते.

आज 25 वर्षांनीदेखील ‘हम आपके है कौन’ सिनेमाची Bollywood च्या इतिहासात असणारी नोंद तितकीच ठळक आहे. कारण या सिनेमाने Bollywood च नव्हे, तर भारतीय नीतीमुल्यांना नवी चेतना मिळवून दिली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *