Tue. Dec 7th, 2021

26 /11 च्या ‘या’ रिअल लाईफ हिरोवर बनणार बायोपिक

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष उलटून गेली आहेत.

या हल्ल्याची आठवण आल्यास आजही शरीरावर काटा येतो. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात अनेक सामान्य लोकांचे प्राण गेले होते.

तसेच 14 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली होती.

हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळस्कर, तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्ण यांना यात वीरमरण आले होते.

या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते.

या हल्ल्यानंतर 26/11 चा हिरो अशी त्यांची स्वतंत्र ओळखही निर्माण झाली होती.

लवकरच संदीप यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा येत असून या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

या सिनेमाचे नाव ‘मेजर’ असे आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले.

मेजर ही त्यांची पदवी असल्याने या सिनेमाचे नाव देखील तेच ठेवण्यात येणार आहे.

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा बनवला जाणार आहे.

अभिनेता अदिवी सेश हा या सिनेमात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या जीएमबी इन्टरटेंन्मेंट या निर्मिती संस्थेमध्ये तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का करणार आहेत.

महेश बाबूनेच ट्वीट करून या याबाबत सांगितले आहे.

महेश बाबूसोबतच या सिनेमाची निर्मिती सोनी पिक्चर्स करत आहे. कोणत्याही तेलुगू सिनेमाची निर्मिती करण्याची सोनी पिक्चर्सची ही पहिलीच वेळ आहे.

या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *