Tue. Oct 26th, 2021

‘या’ 301 वर्षं पुरातन वाड्यात साजरा होतोय 3 दिवसीय माघी गणेशोत्सव

माघी गणेश जयंती निमित्त भिवंडी तालुक्यातील 301 वर्ष पुरातन पार्श्वभूमी असलेल्या अंजूर गावातील गंगाजी नाईक यांच्या ऐतिहासिक वाड्यातील सिद्धिविनायक दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. विशेष म्हणजे या सिद्धिविनायकाच्या दर्शनाकरीता पेशव्यांचे सरदार गंगाजी नाईक यांचे वारस खास मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, डोंबिवली, पालघर, अहमदनगर येथून उपस्थित होत असतात.

देशात व राज्यात गणेशाची असंख्य पुरातन, पवित्र मंदिरं असून त्यापैकी एक म्हणून अंजूर गावातील मंदिर प्रसिद्ध आहे.

पेशव्यांचे इनामदार गंगाजी नाईक यांच्या वाड्यातील देवघरात 300 वर्षांपूर्वी सिद्धिविनायकाची स्थापना करण्यात आली.

मंदिराचा इतिहास

या मंदिराचा इतिहास सुध्दा तेवढाच रंजक आहे.

भिवंडी तालुक्यातील खाडी लगतचं अंजूर हे गाव पेशव्यांचे इनामदार गंगाजी नाईक यांच्या ताब्यात होतं.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी या भागात पोर्तुगीजांची सत्ता होती.

त्याविरोधात लढा उभारण्यात गंगाजी नाईक यांचा पुढाकार होता.

चिंचवड येथील मोरया गोसावी यांचे नातू नारायणदेव महाराज यांनी नाईकांना दृष्टांत दिला.

आपल्या पुजेतील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची गणेश मूर्ती गंगाजी नाईक यांना देत तिची स्थापना आपल्या वाड्यातील देव्हाऱ्यात करून तिची नित्यनियमाने पूजा केल्यास यशप्राप्ती होईल, असा आशीर्वाद दिला.

त्यानंतर गंगाजी नाईक यांनीही सिद्धिविनायकाची मूर्ती आपल्या वाड्यातील देवघरात स्थापन केली. तो दिवस होता मार्गशीष चंपाषष्टीचा.

इ .स .1718 मध्ये या प्रसादरूपी मिळालेल्या मूर्तीच्या स्थापनेस यंदा 301 वर्ष पूर्ण होत असून नाईक वाड्यातील प्रतिष्ठापित या गणपतीची पूजाअर्चा गंगाजी नाईक यांच्या चौदाव्या पिढीकडून सुरू आहे.

या माघी गणेश जयंती निमित्त मंदिरात तीन दिवस विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं ऐतिहासिक वाड्यातील या मंदिरात या निमित्त होमहवन , सहस्त्र आवर्तन , पूजा आदी विधी कार्यक्रम केले जात असून त्या निमित्त नाईक कुटुंबातील विखुरलेले कुटुंबीय एकमेकांच्या भेटीसाठी एकत्र येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *