Tue. Sep 27th, 2022

390 व्या शिवजयंतीचा देशभरात उत्साह

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 390 वी जयंती आहे. देशभरात शिवजयंतीचा उत्साह आहे. महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर सरकार म्हणून ही पहिली शिवजयंती असल्याने तिन्ही पक्षातील राज्याचे महत्वाचे नेते आज शिवनेरी गडावर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरे करणारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे प्रथमच तारखेनुसार आणि शासकीय शिवजयंतीला मुख्यमंत्री म्हणून हजर राहत आहेत. गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.

सोलापुरातही छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सोलापूर शहरात शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या पाळण्याचा कार्यक्रम वीरपत्नी, वीरमाता आणि विरकन्या यांच्या हस्ते संपन्न झाला. मोठ्या उत्साहात सोलापूरातील लाखों माता-भगिनी व बांधवांनी एकत्र येऊन रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव सोहळा अनुभवला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्व संध्येला भक्ती-शक्ती चौकात भव्यदिव्य दुमजली राजा छत्रपती शिवाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग करण्यात आला.लोणावळा येथील शिवदुर्ग प्रेमी लिखित नाटकात 250 आबालवृद्ध कलाकारांनी सादर केलेल्या महानाट्यात शिवजयंती, स्वराज स्थापना शपथ, अफजलखानाचा वध, कोंढाणा किल्ला विजय, शाहिस्तेखानाची फजिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संभाजी महाराजांची शौर्यगाथा असे अनेक जिवंत देखावे सादर करून कलाकारांनी नागरिकांची मने जिंकली. यात घोडे, उंट, गाय, बैल यांच्यासह जिवंत तोफेचा ही वापरही केला होता. पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमीच्या हृदयात महाराजांच्या आठवणी ताज्या झाल्यात यात काही शंका नाही.

नांदेडमध्ये महिलांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल रॅली काढली होती. शेकडो महिलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.