‘भाजपला ५ हजार वर्षांचा इतिहास’ – चंद्रकांत पाटील

भाजप पक्षाला ५ हजार वर्षांचा इतिहास असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले आहे. पुण्यात ‘भाजपा: काल, आज, उद्या’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपबद्दल किती अज्ञान असावे. भाजपाला ५ वर्षांच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. भाजपाला मोठा वसा आहे. या पक्षाला हात लावता येणार नाही याची कल्पना आहे. अशावेळी हा ग्रंथ प्रकाशित झाला हे महत्त्वाचं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचं आहे. आम्ही १९५१मध्ये स्थापन झालेलो नाही, तसेच फक्त १९२५मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेत स्थापन झालो नाही तर आमची परंपरा पाच हजार वर्षांपूर्वीची आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात एका ग्रथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊतांना इतिहास माहित नाही. मात्र नवीन सिस्टिम तयार झाली आहे. एकाने खोटं बोललं की दिवसभर त्याने तेच बोलायचे. त्याला इकोसिस्टिम म्हणातात. आणि मग ही इकोसिस्टिम अशी चालते की ते खोटंही खरं वाटायला लागतं, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.