200 फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या रवीची तब्बल 15 तासानंतर सुटका

पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये 6 वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता.

या मुलाला तब्बल 15 तासानंतर बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे.

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळेगावात ही घटना घडली आहे. 6 वर्षाचा रवी भिल खेळता खेळता रस्त्याच्या कडेला खोदलेल्या बोअरवेलमध्ये अचानक पडला.

रवी 200 ते 250 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. मात्र तो 8 फुटावर अडकला.

काल दुपारपासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र 15 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रविला बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कशी घडली ही घटना

रवीचे कुटुंबिय मुळचे शेगाव पाथर्डी येथील रहिवासी आहेत.

त्याचे आई-वडील रस्त्यावर दगड फोडण्याचे काम करतात.

मंचर-नारायणगाव इथे रस्त्याचे काम सुरू असल्याने संदीप भिल आणि त्यांचे कुटुंब मजुरी कामासाठी आले आहेत.

रस्त्याचे काम सुरु असताना रवी मजूरांच्या सर्व मुलांसोबत खेळत असताना रस्त्याच्या कडेला खोदलेल्या बोरवेअलमध्ये पडला.

सर्व मुलं दिसत होती मात्र रवी खेळताना दिसत नसल्याचे पाहून त्याच्या वडिलांनी शोधाशोध केली असता रवी बोअरवेलमध्ये पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर मंचर पोलीस, जिल्हा प्रशासन, तहसीलदार, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली.

Exit mobile version