‘राज्यातील १३५ पैकी ८५ रुग्ण मुंबईत’ – राजेश टोपे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही राज्यांना पत्र पाठवलेलं आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. तसेच केंद्राने पाठवलेल्या पत्रामध्ये इतर राज्यांचाही समावेश असल्याचे टोपे म्हणाले.
राज्यातील १३५ कोरोना रुग्णांपैकी एकूण ८५ रुग्ण मुंबईत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील कोरोना लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले, राज्यांतील मुलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच बुस्टर डोसबद्दल केंद्राने अद्याप काहीही निर्देश दिलेले नाहीत. मात्र, कोणाला बूस्टर डोस घ्यायचा असेल तर खासगी रुग्णालयातून घेऊ शकतात, असे राजेश टोपे म्हणाले.
राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, तरिही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी मास्क वापरण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
‘या’ राज्यांना केंद्राचे पत्र
देशात कोरोना रुग्णांचा चढता आलेख पाहता, केंद्राने काही राज्यांना पत्र पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिले आहे. राज्यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आवश्यक निर्णय घेत सतर्क राहण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.