Wed. Jul 28th, 2021

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 94 वी जयंती, ‘यांनी’ वाहिली श्रद्धांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंती दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक येत आहेत. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसेल असं वचन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं. या वचनाची आता पूर्तता झाली आहे, या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वांद्रे-कुर्ला संकुल येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहिली.

विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहिली. कठोर अन् प्रेमळ, प्रेरणादायी अन् ऊर्जावान हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील… असं त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्राचं वैभव, ज्वलंत विचारांचा ‘मार्मिक’ ठेवा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन…! असं ट्वीट त्यांनी केलंय.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. ‘बाळासाहेब फार आशावादी होते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही फार आशावादी असल्याने हे राज्य ते व्यवस्थित चालवतील’ अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. आपण सुरवातीपासून शिवसेनेत होतो, शाखाप्रमुख सुद्धा होतो, बाळासाहेबांना फार जवळून पाहिले आहे. त्यांचं स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले आहे, असं भुजबळ म्हणाले.

राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली तसेच सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *