गुणरत्न सदावर्तेंवर सोलापुरात गुन्हा दाखल

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सातार, कोल्हापुरनंतर आता सोलापुरातही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाचे अनुषंगाने न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नापसंती दर्शवत निर्णयावर शंका घेत, न्यायाधीशांविषयी अवमानकारक भाषा वापरल्या प्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सोलापुरातील चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. योगेश नागनाथ पवार यांनी ही तक्रार नोंदवली आहे.
कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा?
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केला असल्याची तक्रार दिलीप पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे जाणार का, यावर आज सुनावणी पार पडणार आहे.