Thu. Sep 29th, 2022

‘आमच्या राज्यात एक तक्रारदार गायब’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. सार्वभौम अधिकारांवर भाष्य करत त्यांनी ‘आमच्या राज्यात एक तक्रारदार गायब आहे,’ असे म्हणत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

  औरंगाबाद खंडपीठाचे उद्घाटन सरन्यायाधीश एन. व्ही, रमण्णा यांच्या हस्ते झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला होता. देशमुखांनी सचिन वाझेला दरमहा शंभर कोटी रुपयांची वसुली पूर्ण करण्याचे टार्गेट दिले असल्याचे परमबीर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. या चौकशी दरम्यान परमबीर सिंह यांच्यावरसुद्धा अनेक आरोप करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिंह यांचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

  ‘आरोपी १९५८ पासून फरार आहे आणि त्याची अजून केस सुरू आहे, हा उल्लेख आताच ऐकला. आमच्या राज्यात तर सध्या एक तक्रारदारच गायब झाला आहे. त्याने तक्रार केली, आरोप केले आणि पळून गेला. कुठे गेला काहीच माहीत नाही. पण त्याच्या तक्रारीवरून इकडे तपास आणि धाडींचे सत्र सुरू आहे’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

  न्यायदान प्रक्रियेच्या विलंबात सर्वसामान्य माणूस पिचला जातो. कोर्टात चकरा मारून आयुष्य संपते आणि खर्चही परवडत नाही. म्हणून न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

  सध्या देश ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. अशावेळी स्वातंत्र्यावर ‘अमृतमंथन’ करण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकारांचा आढावा घेण्याची ही वेळ आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सार्वभौम असेल तर ते अधिकार आपण वापरत आहोत का? कुणी पदावर बसला म्हणजे त्याची मर्जी चालणार नाही. मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळे असतात, हे लक्षात आणून देण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रावरही निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.