Fri. Oct 7th, 2022

विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मंगळवारी चौथा दिवस आहे. पावसाळी अधिवेशनात सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले असून सलग चौथ्या दिवशीही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या एका व्यक्तीने विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सातारा जिल्ह्यातील कांदळ गावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (वय 45) असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्यांने विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी आग विझवली. मात्र, या घटनेत संबंधित व्यक्ती भाजली असून व्यक्तीचे संपूर्ण अंग काळेकुट्ठ झाले होते. त्यामुळे सुभाष देशमुख यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता, शेतीच्या वादातून शेतकरी सुभाष देशमुख यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तसेच या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. या धक्कादायक घटनेवर सभागृहात चर्चा झाली असून याप्रकरणी सकोल माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला सर्वोतपरी मदत केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

तसेच, याप्रकरणी विरोधकांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. अतिशय असंवेदनशील ईडीचे राज्यसरकार आहे. पक्ष फोडणे, लोकांना दमदाटी करणे, यामध्ये ते इतके व्यस्त आहेत, की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे सरकार दुर्लक्ष होत आहे. अशी, प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तसेच आमची सर्वांची अपेक्षा होती की, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत करावी. परंतु, या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासच नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असावे. या सर्वाला ईडीचे सरकार जबाबदार असून पक्ष फोडून पन्नास कोटी त्या लोकांच्या घरात जाण्यापेक्षा हे पैसे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले असते तर बरं झालं असतं असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.