Sat. Aug 13th, 2022

‘एक महान कर्मयोगी हरपला’; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांच्या जाण्याने उभ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे.

  ‘प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. आज ते आपल्याला नाहीत. विश्वासच बसत नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम् शांती’ अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

नारायण राणे यांच्याकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली

  भाजप नेते नारायण राणे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहोबांना माझी विनम्र श्रद्धांजली’.

  ते म्हणाले, शंभराव्या वर्षात पदापर्ण केलेल्या पद्मविभूषण बाबासाहेबांचे संपूर्ण जीवनच अतिशय प्रेरणादायी आणि नवीन ऊर्जा देणारे असे होते. आपल्या ओघवत्या वाणीतून छत्रपती शिवराय जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांचे साहित्य, इतिहास आणि अशा अनेक क्षेत्रांतील योगदान खूप मोठे आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खद प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो. ओम् शांती. अशा शब्दांत भाजप नेते नारायण राणे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला – सुधीर मुनगंटीवार

  शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने शिवचरित्राचा संदर्भ ग्रंथ हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

  ते म्हणाले, ‘शिवशाहीर हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर लाखोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे कायम स्मरणात राहतील. शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेबांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या सहाय्याने वन्ही तो चेतवावा, चेतविता चेततो या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ बाबासाहेबांनी दूर केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड श्रद्धा हे बाबासाहेबांचे बलस्थान. या बलस्थानाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रासह अवघे विश्व जिंकले. नुकतीच वयाची शंभरी पूर्ण करणारे बाबासाहेब आमचा मानबिंदू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची शोकभावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

रावसाहेब दानवे यांच्याकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली

  अवघ्या महाराष्ट्राचे भुषण, पद्मविभूषण, ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ‘ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ओम् शांती.’ अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चित्रा वाघ यांच्याकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली

  ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांनी अत्यंत रसाळ शैलीत आणि ओघवत्या भाषेत श्री शिवराय घराघरात पोहोचवण्याचे कार्य केले असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले.

  ‘ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..! ओम् शांती’, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.