Wed. Aug 4th, 2021

वांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी

एकीकडे लॉकडाऊन वाढवला असताना लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी वांद्रे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने कामगारांनी गर्दी केली. हे कामगार लॉकडाऊनचा विरोध करत होते. हे लोक कामगार असून आपल्या गावी जाण्यासाठी गाडी सोडण्यात यावी अशी त्यांची मागणी होती.

२१ दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान लोकांनी संयम बाळगला. मात्र आता त्यांच्या संयमाचा बांध फुटल्याचं दिसून येत आहे. वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमून लांब पल्ल्याची गाडी सोडण्याची मागणी करत होते. या लोकांना येथे राहण्याची, जेवण्याची व्यवस्थित सोय नाही. यामुळे हे लोक त्रासले आहेत. मात्र मिळणाऱ्या रेशन आणि राहण्याच्या सोयीपेक्षा त्यांना आपल्या गावी परतणं जास्त महत्त्वाचं वाटत आहे. या ठिकाणी तसंही काम ठप्प आहे. त्यामुळे येथे थांबण्यापेक्षा आम्हाला गावी परत जायचं आहे, असं या कामगारांचं म्हणणं होतं. यूपी, बिहारमधील कामगारांचा यात भरणा होता. पोलिसांनी ही गर्दी पांगवली आहे.

रेशन मिळत नसल्यामुळे उपाशी कामगारांना रस्त्यावर यावं लागलं अशी टीका माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. एवढे लोक स्टेशनवर जमेपर्यंत राज्य सरकार काय करत होतं, असा सवाल त्यांनी केलाय. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत एक दिवसासाठी तरी लांब पल्ल्यांच्या गाड्या का सुरू केल्या नाही, असा सवाल केला आहे. गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. आत्तापर्यंत यात १९७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३७ लोकांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *