Fri. Sep 30th, 2022

‘थोडी नाराजी आहे, पण…’

बच्चू कडू यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी मंत्रिपद न मिळाल्याने थोडी नाराजी असल्याचं म्हटलं आहे. ‘थोडी नाराजी आहे, पण एवढी जास्त नाराजी नाही की गट सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ,’ अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी अखेर पार पडला आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नाराज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, ‘थोडी नाराजी आहे, पण एवढी जास्त नाराजी नाही की गट सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. पुढे विस्तार व्हायचा आहे. मी मंत्रिपदासाठी त्यांना पाठिंबा दिलेला नाही. काही मु्द्द्यांवरुन पाठिंबा दिला आहे. जर ते होत नसेल म्हणून तर आम्ही विचार करु. मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं म्हणून आम्ही मागितलं होतं. जर आश्वासन दिलं नसतं तर आम्ही मागितलंच नसतं. हे राजकारण आहे. इथे दोन आणि दोन चार नाही तर शून्यही असू शकतो.’

मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनले पाहिजे. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे… एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार आहे असेही बच्चू कडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.