Fri. May 7th, 2021

बायको मिळेना, म्हणून इच्छामरणासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन!

मनासारखी पत्नी मिळत नसल्याने अखेर निराश होऊन पुण्याच्या एका तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या पत्राची तातडीने दखल घेतली आहे. या व्यक्तीचं मन वळवण्याचे त्यांनी पोलिसांना आदेशही दिले.

काय आहे नेमकं या तरुणाचं दुःख?

हा तरुण पुण्‍यातील दत्तवाडी परिसरात राहतो.

याचं वय 32 वर्षं आहे.

याला चांगली नोकरी आहे, स्‍वत:चं घरही आहे.

सगळं काही छान असूनही याला लग्नासाठी कुणी मुलगी कुणी देत नसल्याने हा तरूण निराश झाला.

घरात आजारी आई-वडिलांची हा मुलगा सेवा करतो.

मात्र आपल्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांची काळजी घेणारी जीवनसाथी आपल्याला मिळावी एवढीच त्याची माफक अपेक्षा होती.

त्याच्या 85 वर्षीय आईला पार्किन्सनचा आजार आहे. मात्र आई वडिलांची काळजी घेण्यास कोणी मुलगी तयार होत नाहीय.

येणारी स्थळं या मुलाने आई-वडिलांना सोडून वेगळं राहावं अशीच मागणी करत होती.

आई-वडिलांच्या आजारामुळे या मुलाला इतर अनेक नोकरीच्या संधी सोडाव्या लागल्या.

त्यामुळे कुणी मुलगी तयार होत नसून प्रत्येक स्थळाकडून त्याला नकार येतोय.

पुणे पोलिसांचं कौतुकास्पद काम!

अनेक नकारांनंतर तरुण निराश झालाय. मानसिकरीत्या तो एवढा खचला की त्याची जगण्याची इच्छाच संपून गेली. अखेर आपलं आयुष्य संपवण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यासाठी त्याने मुख्‍यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली. मुख्यमंत्र्यांकडून या पत्राची तातडीने दखल घेण्यात आली आणि त्यांनी पोलिसांना या तरुणाला असं पाऊल उचलण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यात आले.

पुणे पोलिसांनीही हे प्रकरण दांडगाईने न हाताळता संवेदनशीलता लक्षात घेऊन हाताळलं.

दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला.

त्यांनी या तरुणाला शोधून काढलं. त्याची समजूत काढली.

त्याचं मन वळवलं आणि त्याला आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त केलं. आज त्यांच्या या कामगिरीमुळे एका तरुणाचं आयुष्य वाचलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *