ज्ञानवापी मशिदीबाहेर तणाव

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. मात्र, दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीत नमाज पठण करण्यासाठी ७०० जण पोहचले. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीच्या बाहेर पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज ज्ञानवापी मशिदीसमोर शुक्रवारी नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने जमले. तब्बल ७०० मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी मशिदीसमोर पोहोचल्याने मशिदीबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झालं. मात्र, प्रशासनाकडून ज्ञानवापी मशिदीचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला. तसेच मशिदीसमोर नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे नमाज पठण करण्यासाठी दुसऱ्या मशिदीत जाण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालायत सुनावणी पार पडणार आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. १४, १५, १६ मे रोजी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले असून या तीन दिवसांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. गुरुवारी हिंदू पक्षाच्या वकिलांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार आज दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयात ज्ञानवापी मशिदीसंदर्भात सुनावणी होणार असून ‘ज्ञानवापी मशिद की मंदीर’, याबाबतचा उलगडा लवकरच होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.