Tue. Oct 26th, 2021

समाजभानाचा महत्व पटवून देणारा अनोखा विवाह समारंभ

नुसतं लग्न म्हटलं तर डोळ्यासमोर पैशाची उधळण दिसते. वधू वरांचा तर थाटच गगनात मावेनासा असतो. मात्र अमरावती जिल्ह्यातील सातेगाव येथील नव दाम्पत्याने समाजापुढे आदर्श ठेवत लग्नात पैशाची उधळण न करता आगळावेगळा उपक्रम करीत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

अमरावतीच्या सातेगाव या छोट्याशा गावात असलेलं शेळके कुटुंब. शेळके कुटुंबातील सनीच लग्न ठरलंय. मात्र सनीने लग्नात पैशाची उधळण करण्यास नकार देऊन समाजापुढे आदर्श ठेवण्याचा संकल्प केला आहे. लग्न पत्रिकेच्या पाहिल्या पानावरच शेळके कुटुंबियांनी “विका प्रसंगी घरदार नका राहू अडाणी” असा संदेश देणारे वैराग्य मूर्ती गाडगेबाबांचा फोटो लावला आहे.

तसेच विशेष म्हणजे संविधानाची उद्देश पत्रिका लग्नपत्रिकेच आकर्षण ठरलं आहे. यातही संविधान राष्ट्रपतींना सुफुर्त करतांनाच छायाचित्र आहे. त्यामुळे ही प्रबोधनात्मक लग्नपत्रिका ठरली आहे.
शेळके कुटुंबातील नवदाम्पत्यांनी लग्नमंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

सोबतच लग्नात येणाऱ्या महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. या रक्तदान शिबिरात ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. इतकंच नाही तर वधू वरासह ६ जणांनी नेत्रदान आणि ५ लोकांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे. या दाम्पत्यांनी नवविवाहित आयुष्याची सुरुवात करताना देहदानाचा अर्ज भरून केली आहे.

इतकंच नाही तर लग्नपत्रिकेच्या आतील भागात बळीराजाचा फोटो लावून शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ आणि बहुजन समाजातील शिक्षणाचे महत्व पटवून देणारे महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचं छायाचित्र आहे.

लग्नपत्रिकेतूनच प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शेळके कुटुंबातील लग्नाची सर्वत्र चर्चा होते आहे. इतरांनी देखील सामाजिक बांधिलकी जोपासत शेळके कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. असा संदेश लग्नातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *