Lockdown | पोलिसांच्या मदतीला धावून आला ‘देव’

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अत्यावश्यक सेवा वगळल्यास सर्व दुकानं बंद आहेत. राज्यातील रस्त्यावर पोलिस गस्त घालत आहेत. रस्त्यावर सर्व दुकानं बंद असल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही खाण्यापिण्याची गैरसोय झाली आहे. या पोलिसांच्या मदतीला बदलापुरातील तरुण धावून आला आहे. देवव्रत पुरकर असं या तरुणाचं नाव आहे.

देवव्रत लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बदलापुरातील पोलिसांना अल्पोपहार उपलब्ध करुन देत आहे. दररोजच्या अल्पोपहारामध्ये नवनवीन पदार्थ असतात. यामध्ये शिरा, पोहे, उपमा, बटाटेवडे यासारखे पदार्थ पोलिसांना खाण्यासाठी दिले जात आहेत.

हे पदार्थ तयार करण्यासाठी देवव्रत याची आईही पदार्थ तयार करुन देत आहे. हे पदार्थ तयार करताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते आहे.
विशेष म्हणजे हा तरुण पोलिसांना मध्यरात्रीच्या वेळेस पोलिसांना अल्पोपहार पुरवत आहे. रात्री ९वाजेपर्यंत अनेक समाजसेवी संस्थांकडून अल्पोपहार तसेच अन्नवाटप केलं जातं. पण रात्री खाण्यापिण्याची काहीच सोय नसते. त्यामुळे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना मध्यरात्रीच्या वेळेस अल्पोपहार पुरवत असल्याचं देवव्रतने सांगितले.
आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून देवव्रत ही सेवा करत आहे.