Fri. Sep 17th, 2021

‘नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत’

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाविरोधातील पोलीस कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नसल्याचं सांगितल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेत नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

यादरम्यान भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत किंवा ते अल्लाहचे गुनाहगार आहेत असं ते म्हणाले आहेत. ‘रमजानच्या पवित्र महिन्यात वाईट काम करायचं नसतं आणि खोटं बोलायचं नसतं हे लहान मुलालाही कळतं. पण राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक लोक आज महाभयानक अशा संकटात खोटं बोलून समाजात विष पेरण्याचं काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच लोकांनी त्यांना उघडं पाडलं’, असं आचार्य तुषार भोसले म्हणाले आहेत.

‘मला वाटतं सत्तेच्या नशेमध्ये रमजानसारख्या पवित्र महिन्याचं पावित्र्य घालवण्याचं काम नवाब मलिक यांनी केलं आहे. म्हणून एक तर ते सच्चे मुसलमान नाहीत किंवा अल्लाहचे गुनाहगार आहेत. कारण त्यांनी रोजा सुद्ध तोडला आहे’, असंही तुषार भोसले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *