Fri. Sep 17th, 2021

स्मिता पाटील यांच्या मुलानं कोरलं हृदयावर त्यांचं नाव…

मुंबई : आई आणि मुलाचं नातं शब्दांत मांडता येत नाही या नात्याची कुठली व्याख्या देखील नाही आणि या नात्याला व्यक्त करता येत नाही. पण, ते व्यक्त करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न कायमच सर्वांची मनं जिंकतात. सध्या एका बॉलिवूड अभिनेत्यानं अशाच प्रकारे त्याचं आणि त्याच्या आईचं नातं सर्वांसमोर आणलं आहे. हा अभिनेता म्हणजे प्रतिक बब्बर. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर आजही त्यांच्या आईची आठवण वेळोवेळी करत असतांना दिसतो. स्मिता पाटील आज जरी या जगात नाही तरी त्यांचं नाव हे चित्रपटसृष्टीत आजही जिवंत आहे. प्रतिकच्या जन्मानंतर फार कमी कालावधीतच स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. प्रतिक हा त्यांच्या आई बरोबर फार कमी काळ राहिला आहे. मात्र प्रतिक आजही त्यांच्या आईचे फोटो हा सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आईच्या निधनामुळं निर्माण झालेली पोकळी प्रतिकच्या जीवनात भरुन निघाली नाही. पण, त्यानं कायमच आईच्या आठवणींना आपल्या जीवनात मानाचं स्थान दिलं आहे. प्रतिकने नुकतंच शब्दश: त्याच्या आईचं म्हणजेच स्मिता पाटील यांचं नाव त्याच्या हृदयावर कोरलं आहे, स्मिता अशा नावाचा टॅट्टू त्यानं छातीवर डाव्या बाजूला कोरून घेतला आहे. ‘स्मिता फॉरएव्हर’ असं कॅप्शन लिहित त्यानं याबाबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. प्रतिकनं टॅट्टूचा फोटो शेअर केल्यावर अनेकांनी यावर कमेंट्स आणि लाईकचा वर्षांव केला. प्रतिकने आईसाठी उचललेलं हे पाऊल सध्या सर्वांचीच मनं जिंकून जात आहे. प्रतिकने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, . ‘मला कायमच आईचं नाव असणारा टॅट्टू काढायचा होता. मी कायमत या क्षणाच्या प्रतिक्षेत होतो, अखेर तो योग्य क्षण आला. जिथे तिची योग्य जागा होती, तिथेच तिचं नाव कोरलं गेलं. 1955 हे वर्ष तिचं जन्मवर्ष दर्शवतं तर ती माझ्यासोबत चिरंतन असेल असं त्यापुढे असणारं चिन्हं दर्शवतं’, असं तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *