Fri. Sep 30th, 2022

‘शेवंता’ साकारताना…

मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये वाढलेली मुलगी

इंग्रजी आणि फ्रेंच भाषेवरच सगळं लक्ष असलेली

रूपारेल कॉलेजमधून BMS केल्यावर बँकेत जॉब करणारी

MBA करायला London ला जाण्यासाठी निघालेली…

Cut To

कोकणातलं गाव

मालवणी भाषेतील संवाद

हालाखीच्या परिस्थितीने पिचलेली विवाहिता

एका मध्यमवयीन क्रूर माणसाला आपल्या नादी लावून आपल्या इच्छा पूर्ण करणारी स्त्री…

या दोन्ही व्यक्तींमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे ना… मग या दोघींजणींमधला समान धागा कोणता?

हा प्रश्न खरंतर मलाही पडला होता, जेव्हा मला शेवंताची व्यक्तिरेखा साकारण्याबद्दल विचारणा झाली होती. मला एकदा नव्हे, तर चक्क दोनदा ऑडिशन द्यावी लागली होती, शेवंताच्या भूमिकेसाठी. कारण पहिल्यांदा मला शेवंता समजलीच नव्हती… पण तिच्या व्यक्तिरेखेचा अवाका मला हळूहळू उमगत जाऊ लागला. अजूनही शेवंताचे पदर उलगडतायत… जितके ते ‘रात्रीस खेळ चाले 2’ पाहणाऱ्या प्रेक्षकांना थरारून सोडतायत, तितकेच मलाही समाधान देतायत.

मी साकारत असलेली शेवंता आहे तरी कशी?

‘रात्रीस खेळ चाले’’चा पहिला सिझन पाहिल्यापासूनच मला सुशल्याच्या आईबद्दल उत्सुकता होती. ती कोण असेल, कशी असेल, असा प्रश्न मला पडायचाच. पण ती शेवंता चक्क मला साकारायला मिळेल, असं वाटलंच नव्हतं.

मला शेवंता समजू लागली, ती मुळातच तिच्या सशक्त व्यक्तिरेखेमुळे… ‘बाई’ ही अशीही असते, हे मराठी सिरीयलमध्ये फार कमीवेळा पाहायला मिळतं.

शेवंता रुढार्थाने नायिकाही नाही, खलनायिकाही नाही… पण शेवंता जशी काही आहे, तशी कुणीच नाही. हे मीच नाही, तर मालिका दररोज पाहणारे प्रेक्षकही म्हणतायत.

ही व्यक्तिरेखा लिहीलीच इतकी दमदार आहे, की साकारायला फार मजा वाटते.

शेवंता दिसायला खूप सुंदर असणार, हे ठरलंच होतं. तिचं एक स्केचही काढून ठेवलेलं होतं. त्या स्केचशी मी मिळतीजुळती असल्याने माझी निवड झाली.

शेवंताचे डोळे आणि त्याहून महत्त्वाची तिची नजर, तिच्या केसांची बट, तिचं पुष्ट शरीर… एवढंच काय तिचं घामेजलेलं अंगही क्रिएटिव्ह टीमच्या डोक्यात सुस्पष्ट होतं. सिरीयलमध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेवरच प्रचंड काम केलं गेलंय.

शेवंताची मला आवडलेली गोष्ट म्हणजे ती अण्णांना नादी लावणारी असली, तरी ती चवचाल नाही.

ती पाटणकरबरोबरच्या ओढग्रस्तीच्या संसाराला विटलेली आहे.

नवऱ्याचा भिडस्तपणा, साधेपणा, प्रामाणिकपणा कधीच आपल्याला सुखी करू शकणार नाही, याची तिला जाणीव आहे.

मात्र त्याचवेळी अचानक तिच्यासमोर थेट बंदूक धारण केलेला धिप्पाड देहाचा, भेदक डोळ्यांचा जाडजुड मिशा राखलेला अण्णा येतो. तिच्यासाठी वेडा होतो, भरजरी साड्यांपासून दागदागिन्यांपर्यंत तिचे अनेक शौक पूर्ण करतोय. शेवंतासारख्या स्त्री ने निश्चितच काहीतरी हेरलंय. ते फक्त संपत्ती आणि छानछोकीपुरतंच मर्यादित नाहीये. शारीरिक गरजांपुरतंही ते नाहीय. ते त्या सर्वांच्या पलिकडचं आहे. अण्णा नाईकांसारखं क्रूर वादळ आपल्या नजरेच्या दावणीला बांधायचं कसब तिच्यात आहे आणि ती ते अत्यंत संयतपणे कमी शब्दांत आणि नजरेच्या भाषेने मिळवतेय.

‘शेवंता’चं वेगळेपण…

मला शेवंता म्हणूनच प्रचंड भावली, कारण मी अशी व्यक्तिरेखा कधी साकारलीच नव्हती.

साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी माझे फेसबुकवरचे फोटो पाहून मला झी मराठीच्या ऑफिसमधून फोन आला होता. मला ‘आभास हा’ या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली होती. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी ती भूमिका केली. कॉलेजमधल्या अल्लड पोरीची ती भूमिका लोकांनी पसंतही केली.

‘तू जीवाला गुंतवावे’ मालिकेत मी वहिनीची भूमिका केली,

तर ‘आराधाना’ मालिकेत पुन्हा मुख्य भूमिका केली.

त्या मालिकेत मी देवावर प्रचंड श्रद्धा असणारी सोशिक पत्नी साकारली होती.

महिला वर्गात ती मालिका गाजली. मी आलाय मोठ्ठा शाहणा’ सारखं विनोदी नाटक केलं, ज्याचा मला ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. काही हिंदी मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजही केल्या. मात्र ‘शेवंता’सारखी व्यक्तिरेखा साकारायची संधी मला मिळाली नव्हती.

 

माझे डोळे सुंदर आहेत, याबद्दल मला अनेकवेळा कॉम्प्लिमेंट्स मिळायच्या. पण माझे हे डोळे शेवंताला मिळाले आणि वेगळीच ‘घायाळ करणारी नजर’ लाभली. ही माझी quality खरंतर मला स्वतःलाही माहीत नव्हती. शेवंताचा मादकपणा हा तिच्या व्यक्तीमत्त्वाचा USP आहे. पण त्यासाठी तिला अंगप्रदर्शनाची गरज कधीच पडत नाही. तिला छछोरपणा करावा लागत नाही. अंगभूत गुणांच्या आधारावरच ती सगळे खेळ खेळतेय… आणि हे काहीतरी विलक्षण आहे… भारी आहे, हे मला स्वतःला perform करताना जाणवतं.

रोमान्स करण्याचं दडपण!

शेवंताच्या पात्राबद्दल कुतुहलाचा आणि तितकाच दडपण आणणारा मुद्दा म्हणजे प्रेमप्रसंग…

ही लव्हस्टोरी आजची नाही. शहरी नाही… त्यामुळे प्रसंग साकार करण्यासाठी वापरलेली स्टाईल वेगळी आहे.

त्यातून अण्णांची भूमिका साकारणारे माझे सहकलाकार माधव सर माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठे असल्याने लव्हसीन करण्याबद्दल सुरुवातीला थोडा awkwardness होता.

पण पहिल्याच प्रसंगात ते दडपण दूर निघून गेलं. उलट आता तर पहिल्याच take मध्ये सीन आम्ही OK करतो. त्यामुळे अभिनेत्री म्हणून पण मी कुठेतरी चार पाऊलं पुढे जातेय, हे माझं मला समजायला लागतं.

 

शेवंताने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलंय, हे खरंय… पण मला स्वतःलाही तिने फारच आकर्षित केलंय.

वैयक्तिक आयुष्यात खूप काही गमावल्यावर एका अवघड वळणावर मला शेवंता भेटली.

तिने मला खूप काही दिलंय. यापूर्वी कधीही न साकारलेली भूमिका दिली आहे.

चांगली टीम आणि सहकलाकार दिले आहेत.

माझ्यातल्या अभिनेत्रीला प्रगल्भ होण्याची संधी दिलीय.

माझी स्वतःशीच नव्याने ओळख करून दिलीय आणि अभूतपूर्व प्रसिद्धीही दिली आहे…

या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेला हातभार लावणाऱ्या आणि डोक्यावर घेणाऱ्या सर्वांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत… आणि हो, मला तुला ही थॅंक्स म्हणायचंय… थँक्यू शेवंता!!

 

ब्लॉग- अपूर्वा नेमळेकर

शब्दांकन- आदित्य नीला दिलीप निमकर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.