‘जय महाराष्ट्र’ची पत्रकार ते यशस्वी अभिनेत्री : गौरी किरणचा प्रवास

‘पुष्पक विमान’ या सिनेमातील मोहन जोशी आणि सुबोध भावे यांच्याबरोबरीने प्रेक्षकांना आवडलेली व्यक्तिरेखा म्हणजे ‘स्मिता’. ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री गौरी किरण हिने आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कोकणातील लहानशा गावातून आलेल्या गौरी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलंय. कोकणातील मंडणगड या लहानशा गावातून मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात करीअर करण्यासाठी आलेल्या गौरीने काही काळ पत्रकारिताही केली. मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी गौरी ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीवर मुंबई वार्ताहर म्हणूनही काही काळ कार्यरत होती.
‘पुष्पक विमान’ या सिनेमात तिने साकारलेली ‘स्मिता’ ही कोकणच्या मुलीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ‘संचार’, ‘नातीखेळ’ यासिनेमांमधूनही गौरी किरणने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. केवळ चित्रपटच नव्हे, तर ‘तू माझा सांगाती’, ‘असं सासार सुरेक बाई’ या daily soaps मध्ये तसंच ‘लक्ष्य’, ‘शौर्य’, ‘अस्मिता’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही तिने भूमिका केल्या. सध्या ती पोलीस investigation वर आधारित ‘स्पेशल 5’ या मालिकेत ‘सब-इन्स्पेक्टर विद्या शिंदे’ ही भूमिका साकारत आहे.
‘महाराष्ट्राचा फेव्हरिट कोण?’, ‘सिनेसिटी अवॉर्ड्स’, ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव 2019’ अशा विविध पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळालं आहे. ‘नववा चित्रपट पदार्पण पुरस्कार’मध्ये गौरीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ मिळाला आहे. तसंच तिला ‘56 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवा’त ‘उत्कृष्ट पदार्पण- अभिनेत्री’ विभागात नामांकन मिळालं आहे.
अभिनयासोबतच निवेदिका म्हणूनही गौरी हिने मनोरंजन क्षेत्रात नाव कमावलंय. ‘म म मराठीचा’, ‘बोलते तारे’ यांसारख्या कार्यक्रमांमधून ती प्रेक्षकांसमोर आली. नाटकापासून आपल्या अभिनयप्रवासाला सुरुवात करणाऱ्या गौरीने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. इंटरनेटवर गाजणाऱ्या RVCJ या वेबशोंचेही तिचे अनेक episodes गाजले आहेत. अनेक जाहिराती आणि ‘शॉर्ट फिल्म’मध्येही गौरी किरणने अभिनय केला आहे.