Fri. Sep 30th, 2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा देशातील मुलींवर अवलंबून असल्याचे सांगितले.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,

नमस्कार !

शहात्त्त्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देते. या गौरवास्पद प्रसंगी आपल्या सर्वांना संबोधित करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. एक स्वतंत्र देश म्हणून भारत आपली ७५ वर्षे पूर्ण करत आहे.
१४ ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या-भीषण वेदनांचा स्मृती-दिन म्हणून पाळला जात आहे. हा स्मृतीदिन पाळण्याचा उद्देश, सामाजिक सद्भावना, जनतेचं सक्षमीकरण आणि एकोप्याला अधिक बळ देणे हा आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, आपण वसाहतवादी शासनाच्या बेड्या तोडून टाकल्या होत्या. त्या दिवशी आपण आपल्या नियतीला नवे स्वरूप देण्याचा संकल्प केला होता. त्याच शुभदिनाचा वर्धापन दिन साजरा करत असताना, आपण सगळे, स्वातंत्र्यसैनिकांना आदरपूर्वक वंदन करतो. आपण स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकू, यासाठी, त्यांनी आपल्या सर्वस्वाचे बलिदान केले.

भारताचं स्वातंत्र्य आपल्यासह जगात लोकशाहीच्या प्रत्येक समर्थकासाठी उत्सवाचं कारण आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आणि विचारवंतांनी, आपल्या लोकशाही शासन प्रणालीच्या यशस्वितेबाबत शंका व्यक्त केली होती. त्यांच्या या शंकांच्या मागे अनेक कारणंही होती. त्या काळी, लोकशाही व्यवस्था ही आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांपर्यंतच मर्यादित होती. परदेशी शासनकर्त्यांनी, कित्येक वर्षे, भारताचे शोषण केले होते. यामुळे, भारताचे लोक, दारिद्र्य आणि निरक्षरतेच्या संकटांचा सामना करत होते. मात्र, भारतीयांनी त्या सर्व लोकांच्या शंका खोट्या ठरवल्या. भारताच्या या मातीत लोकशाहीची मुळे, सातत्याने खोलवर रुजत गेली आणि अधिक मजबूत होत गेली.

बहुतांश लोकशाही देशांत, मत देण्याचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला होता. मात्र, आपल्या गणराज्याच्या सुरुवातीपासूनच, भारताने सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार केला. अशाप्रकारे, आधुनिक भारताच्या निर्मात्यांनी, प्रत्येक प्रौढ नागरिकाला राष्ट्रनिर्मितीच्या सामूहिक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी प्रदान केली. लोकशाहीची खरी ताकद काय असते, याचा परिचय संपूर्ण जगाला करुन देण्याचे श्रेय भारताचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.