Sat. Jul 2nd, 2022

तिसऱ्या लाटेचा बागुलबुवा कुणाकडून?

मागच्या भागात म्हणल्याप्रमाणे, तिसरी लाट येणार वा नाही हे तसं कोणालाही सांगणं अवघडच आहे. माझ्यासारख्या डॉक्टर नसणाऱ्याला तर आणखीनच अवघड! पण मी एक गोष्ट मात्र छातीठोकपणे सांगू शकतो, ती म्हणजे ह्या बागुलबुवाच्या जोरावर काही मंडळी जोरदार पैसे कमावणार!

ह्याचं छोटं उदाहरण म्हणजे दुसरी लाट एकदम शिगेला पोहोचली असताना, म्हणजे एप्रिलच्या मध्याला, दिल्लीत झालेला ऑक्सिजन सिलिंडरचा घोटाळा. दिल्लीतील ‘खान चाचा’ ह्या प्रसिद्ध रेस्टॉरंटचा मालक नवनीत कालरा ह्याला मे महिन्याच्या मध्याला पोलिसांनी अटक केली. ह्या नराधमाच्या विविध रेस्टॉरंट्सवर पोलिसांनी छापा घातला, तेव्हा त्यांना ५२४ सिलिंडर मिळाले अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कालरा सिलिंडर साधारण १६,००० रुपयाला खरेदी करून तो काळ्या बाजारात—म्हणजे थोडक्यात मरणाशी झुंजणाऱ्या आणि व्यवस्थेसमोर हात टेकलेल्या अश्या व्यक्तीच्या नातेवाईकांना—५०,००० ते ७०,००० रुपयांना विकत असे. (Source : https://www.timesnownews.com/delhi/article/delhi-oxygen-concentrator-scam-khan-chacha-owner-naveet-kalra-sent-to-3-day-police-custody/758256)

आणि कालराला जामीन मिळावा ह्यासाठी न्यायालयात लढले काँग्रेसचे अभिषेक मनूसिंघवी! तसं म्हणावं तर एक व्यावसायिक वकील म्हणून त्यांनी ही केस घेणं फार चूक नाही. पण काँग्रेसचे एक प्रमुख नेते आणि सामाजिक क्षेत्रातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी विवेक बाळगायला हवा होता असं वाटतं.
आणखी एक ‘स्कॅम’ समोर येतोय, तो म्हणजे केजरीवाल सरकारची ऑक्सिजनची (फुगवून केलेली ) मागणी. सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलच्या मते, दिल्ली सरकारनं ऑक्सिजनची गरज वस्तुस्थितीपेक्षा चौपट वाढवून सांगितली. (Source : https://www.tribuneindia.com/news/delhi/kejri-govt-inflated-oxygen-demand-4-times-during-peak-supreme-court-panel-273919).

ह्यामागची योजना स्पष्ट आहे. एका बाजूला कालरा आणि मंडळींना घेऊन ऑक्सिजनचा काळा बाजार चालवायचा आणि दुसऱ्या बाजूला गरजेपेक्षा अतिप्रचंड जास्त ऑक्सिजन केंदाकडे मागायचा, आणि वर तो मिळाला नाही तर (आणि साहजिकच तो मुबलक मिळणं कठीण असल्यामुळे) मोदींवर खापर फोडायची संधी साधायची आणि मागणी पूर्ण झाली तर ‘जितं मया’म्हणून आपली पाठ थोपटून घेणारा प्रचार करायचा. हे नेहमीचं `हमखास यशस्वी ` केजरीवाल-तंत्र आहे. मोदींची काहीही चूक नाही आणि सगळं जग त्यांच्याविरुद्ध काहीतरी षडयंत्र रचतंय असं मला अजिबात म्हणायचं नाही. असल्या कॉन्स्पिरीज केजरीवाल भक्तांकडेच उदंड असतात.

चुकलं हे की दुसरी लाट टळली असा मोदींचा आणि सत्तारूढ पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा समज झाला. आपण कोरोनाला हरवलं आणि आता ‘अच्छे दिन आ गये’ अश्या गैरसमजात ते गाफील राहिले. त्यामुळेच की काय पण कोरोनाची लाट अत्यंत जोरात असताना त्यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभा घेतल्या.

मोदींसारख्या पंतप्रधांनी ममता बॅनर्जींच्या पातळीवर उतरणं अपेक्षित नाही. ममतांसारखे विध्वंसक आणि असहिष्णू प्रवुत्तीचे विरोधक हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. पण देशाचे पंतप्रधान म्हणून अपयशाचं खापरही आपल्याच डोक्यावर फोडलं जाणं अपरिहार्य आहे, किंबहुना तेच रास्त आहे. आपण यश आणि अपयश दोन्हीचे धनी असता. राजकारणात पूर्ण वस्तुस्थितीपेक्षा perceptionला जास्त महत्व असतं.

दुसरी चूक म्हणजे असं म्हटलं जातं की सरकारचं लसीकरणाचं धोरण चुकलं. लसीकरण हा तसा जरा मोठा विषय आहे, त्याबद्दल पुढच्या भागात…

– आदित्य कुवळेकर

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.