तिसरी लाट येणार का?

कोरोनाच्या दुसऱ्या आणि भयानक लाटेतून आपण हळूहळू बाहेर पडत असतानाच तिसऱ्या लाटेच्या आगमनाची चर्चा सुरु झालीये. कधी संपणार हे सगळं? आपण मागे कुठे चुकलो? सरकारी यंत्रणा कुठे कमी पडली? आणि आता पुढच्या आव्हानाला—जर ते आलं तर—आपण कसं तोंड द्यायचं, असे सगळे प्रश्न माझ्यासारख्याच अनेकांना भेडसावत असणार. ह्या सगळ्या प्रश्नांचा वेध वस्तुस्थितीच्या आधारे घेणं आवश्यक आहे.
तिसरी लाट येणार का?
तसं म्हणलं तर कोण कुठे चुकलं ह्यापेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे तिसरी लाट खरंच येईल का, आणि ती आली तर ती किती तीव्र असेल? आता लॉकडाऊन उघडल्यानंतर लोक एकमेकांना भेटणार. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात रूग्णसंख्या वाढणारच. ते पाहून काही तज्ज्ञ आणि राजकारणी वगैरे लोकांनी तिसऱ्या लाटेची भाकितं वर्तवायला सुरुवात केली आहे.
थोडक्यात सांगायचं तर मला ही भाकितं थोडीफार “चित भी मेरी पट भी मेरा” स्ट्रॅटेजीप्रमाणे वाटतायत.
ह्याचं साधं कारण म्हणजे ‘झालेलं आणि होणारं लसीकरण’. मार्च अखेरीस, म्हणजे जेव्हा जोरदार दुसरी लाट येणार हे १००% निश्चित होतं तेव्हा, आपल्याकडे किमान एक डोस मिळालेल्या लोकांची संख्या होती ५ कोटी ३० लाख, आणि दोन डोस मिळालेल्या लोकांची संख्या होती ९० लाख. आज, जेव्हा कोरोना बऱ्याच अंशी आटोक्यात आहे, तेव्हा एक डोस किमान मिळालेल्या लोकांची संख्या आहे २७ कोटी आणि दोन डोस मिळालेल्या लोकांची संख्या आहे ५ कोटी ५० लाख. त्याच बरोबर सध्या रोज ३०-३५ लाख लोकांचं लसीकरण सुरु आहे. त्यात साधारणपणे २५ लाख तरी पहिला डोस घेणारे लोक दिसत आहेत (Source: https://ourworldindata.org/covid-vaccinations?country=IND). त्यामुळे पुढच्या १५-२० दिवसात किमान एक डोस मिळालेले ३०-३२ कोटी लोक असणार. म्हणजे आपण मार्च अखेरच्या तुलनेत सहा पट जास्त लोकांचं लसीकरण केलेलं असणार आहे. सहाजिकच, कोरोनाचा प्रसार त्यामुळे तितकाच कमी होणं अपेक्षित आहे.
आता ह्यात दुसरा मुद्दा असा मांडला जातो की नवीन व्हेरिएन्टवर लस काम करत नाही. पण ह्याला अजून कोणताही पुरावा नाही. डेल्टा व्हेरिएन्ट विरुद्ध ICMR (इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च)ने सांगितलंय की कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन दोन्हीही प्रभावी आहेत. डेल्टा प्लस बद्दल अभ्यास अजून चालू आहे.त्याबरोबरच विविध राज्य सरकारांच्या यंत्रणाही फेब्रुवारी-मार्च सारख्या गाफील राहणार नाहीत असं वाटतं.
तरीही तिसरी लाट येणार नाहीच का? तर हे निश्चित सांगणं कोणालाही शक्य नाही. ज्याच्या विरुद्ध लसी चालतच नाहीत असा नवीन कोणतातरी व्हेरिएंट येऊन जोरात पसरू शकतो. पण सद्यपरिस्थिती पाहता मोठी तिसरी लाट येण्याची शक्यता मला वाटत नाही. माझ्या मते राज्य सरकारं आणि “तज्ज्ञ” तिसऱ्या लाटेच्या भीतीचं अतिशय वाईट राजकारण करतायत. ही भीती लोकांच्या मनात बसवायची, त्या नावावर भरपूर ऑक्सिजन प्लांटसाठी केंद्र सरकारकडून पैसे उकळायचे, आणि वर तिसरी लाट आली नाही की पत्रकारांना बरोबर घेऊन आपण दुसऱ्या लाटेतून धडा घेऊन कसं कोरोनाला हरवलं हा गाजावाजा करायचा असं सूत्र दिसतं. ह्याचं साधं उदाहरण म्हणजे हेच तज्ज्ञ आणि राजकारणी मार्च मध्यालासुद्धा म्हणत होते की दुसरी लाट येणार नाही. आणि कोरोनाच्या नावावर केंद्राला लुटण्याचा प्रकार दुसऱ्या लाटेत सुद्धा काही सरकारांनी केला. ह्याचं एक ठळक उदाहरण म्हणजे दिल्ली सरकारनं ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल केलेला प्रचार आणि गाजावाजा. त्याबद्दल आणि अश्याच प्रकारच्या कांगावखोर आणि दिशाभूल करणाऱ्या राजकारणाबद्दल पुढच्या लेखात बघू.
– आदित्य कुवळेकर