Thu. Jan 27th, 2022

शंभर दिवसात सर्वसामान्यांची मोदी सरकारपासून सुटका होईल – राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. विरोधक त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आटापिटा करत आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या एकजुटीची खिल्ली उडवली होती. त्याला राहुल यांनी उत्तर दिले आहे. मोदी सरकारपासून देशाच्या जनतेची 100 दिवसांत सुटका होईल, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

शनिवारी कोलकात्यामध्ये विरोधकांची महारॅली होती. यामध्ये देशभरातील 18 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. विरोधकांच्या या रॅलीची मोदींनी खिल्ली उडवली. ‘स्वत:च्या अस्तित्वासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व पक्ष बचाव, बचाव ओरडत आहेत,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांच्या एकीला चिमटा काढला. मोदींच्या या विधानाला राहुल यांनी उत्तर दिले. ‘महामहिम, मदतीची याचना देशातील लाखो बेरोजगार तरुण, संकटग्रस्त शेतकरी, वंचित दलित आणि आदिवासी, त्रस्त अल्पसंख्यांक, उद्ध्वस्त झालेले व्यापारी करत आहेत. ते तुमच्या अत्याचार आणि अक्षमतेपासून मुक्त होण्यासाठी मदतीचे आवाहन करत आहेत. ही मंडळी 100 दिवसांमध्ये मुक्त होतील,’ असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींनी विरोधकांच्या एकजुटीवर भाष्य केले होते. ही मंडळी ज्या मंचावरुन देश आणि लोकशाही वाचवण्याची भाषा करत होती, त्याच मंचावर एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख केला. अखेर सत्य कधी लपतं का?, असा सवाल मोदींनी विचारला. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा केवळ एक आमदार आहे. मात्र तरीही ते आम्हाला घाबरतात. कारण आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो, असे यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *