Jaimaharashtra news

#BoycottChineseProducts: चीनला धडा शिकवा; नेटीझन्स संतापले

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतीय चांगलेच संतापले आहेत.

मसूदला पाठिंबा देणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी चीनी वस्तूंचा वापर बंद करा असे मत अनेक भारतीयांनी ट्विटवर मांडले आहे.

#BoycottChina आणि #BoycottChineseProducts हे हॅशटॅग सध्या ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे.

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाची मुदत 13 मार्चला संपणार होती. त्याआधीच भारताने अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटून मोर्चेबांधणी केली होती.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने यावेळी त्याला वेगळे महत्त्व होते.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी 2 दिवसांपूर्वी वॉशिंग्टन येथे अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेऊन चर्चा केली होती, त्यात दहशतवादाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

भारताच्या मोर्चेबांधणीला यशही आले होते. 10 हून अधिक देशांनी या प्रस्तावात भारताची साथ दिल्याचे समजते. पण चीनने खोडा घातल्याचे समोर आले आहे.

नकाराधिकाराचा वापर केल्याची ही चौथी वेळ आहे. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानसोबत चीनचे चांगले संबंध आहे.

यापूर्वी चीनने अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर तीनदा नकाराधिकार वापरला होता.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही चीनचा निर्णय निराशाजनक असल्याचे आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे.

अनेकांनी चीनी उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी केली असतानाच काही जणांनी आधी पर्यायी व्यवस्था तयार करालया हवी असं मत व्यक्त केले आहे.

मसूदला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चौथ्यांदा आडकाठी घालणाऱ्या चीनला भारताने चांगला धडा शिकवावा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला ज्या पद्धतीने धडा शिकवत त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यात आली तसेच धोरण चीन संदर्भात राबवण्यात यावे असे मत अनेकांनी ट्विटवर व्यक्त केले आहे.

ट्विटवरही भारतीयांनी #BoycottChina आणि #BoycottChineseProducts या दोन हॅशटॅगच्या माध्यमातून चीनी उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version