Sun. Oct 24th, 2021

बलात्कारातील आरोपी जामिनावर सुटल्यावर महिलेवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न

पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जादूटोणा करून महिलेवर वारंवार बलात्कार करणारा आरोपी अटक पुर्व जामिनावर मोकाट असताना त्याच आरोपीकडून पीडित महिलेवर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलेने याला विरोध केला म्हणून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्नही आरोपीने केला.

पीडित महिला ही बाहेरील गावची रहिवासी असून पोटाची खळगी भरण्यासाठी गेली दहा वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील पेरणे येथे वास्तव्य करत आहे.महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वी राहूल वाळके या आरोपीकडून उसने पैसे घेतले होते. याचाच फायदा घेत आरोपीने पीडित महिलेशी मैत्री करत महिलेवर पेरणे फाटा परिसरात जादुटोण्याचा वापर करत वारंवार बलात्कार केला.

यानंतर पिडीत महिलेने याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी राहूल वाळकेवर बलात्कार आणि जादूटोण्यासाठी गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपी अटक पूर्व जामीनावर सुटला असून मोकाट फिरत आहे.

यानंतर पीडित महिलेने आरोपीपासून मिळणाऱ्या धमक्यांपासून सुटका करण्यासाठी आपले घर बदलत कोरेगाव भीमा येथे वास्तव्य सुरु केलं. परंतु आरोपीने येथेही महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न सुरु केला. बुधवारी रात्री आरोपीने पीडित महिलेच्या घरी जाऊन महिलेवर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न करत महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.

या सर्व धक्कादायक प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणावर प्रचंड नाराजी व्यक्त करत बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला अटकपूर्व जामीन मिळतोच कसा असा प्रश्न उपस्थित केला. तसेच आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी आता शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला तातडीने अटक करून कडक कारवाई करू असं आश्वासन शिक्रापूर पोलिसांनी दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *